नवी दिल्ली : देशभरात अतिशय झपाट्यानं फैलावणारा कोरोना व्हायरस काही अंशी नियंत्रणात येतानाची चिन्हं दिसत असतानाच त्याची भीती मात्र काही केल्या कमी होत नाही. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं कळलं. खुद्द शाह यांनी ट्विट करत याबाबातची माहिती दिली. ज्यामागोमाग आता आणखी एका मंत्र्यांनी अलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी शनिवारी अमित शाह यांनी भेट घेतली होती. ज्यामुळं आता त्यांनी सावधगिरी म्हणून स्वत:च काही काळासाठी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असून, चिंता करण्याची बाब नसल्याची माहिती रवी शंकर प्रसाद यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.




शाह यांना कोरोना झाल्याचं कळताच देशभरातून अनेकांनी त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याचं पाहायला मिळालं. शाह यांनी ट्विट करत म्हटलेलं, 'कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने मी चाचणी केली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे.' शिवाय त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना स्वतःची कोरोना चाचणी करण्याचं आवाहनही केलं होतं. त्याचप्रमाणे स्वतःला क्वारंटाईन करून घेण्याचा सल्ला देखील त्यांनी इतरांना दिला होता.