मोदींच्या निवृत्तीनंतर माझाही राजकारणाला रामराम- स्मृती इराणी
अतिशय प्रभावी अशा पुढाऱ्यांच्या, नेतेंमंडळींच्या नेतृत्वात मी राजकारणात प्रवेश केला
पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या वर्ड्स काऊंट फेस्टिव्हलमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीविषयीचा एक महत्त्वाचा निर्णय सर्वांसमोर मांडला. प्रधान सेवक असा नरेंद्र मोदींचा उल्लेख करत सक्रिय राजकारणातून ते जेव्हा निवृत्ती घेतील त्याचवेळी आपणही राजकीय वर्तुळातून निवृत्त होणार असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केलं.
'अतिशय प्रभावी अशा पुढाऱ्यांच्या, नेतेंमंडळींच्या नेतृत्वात मी राजकारणात प्रवेश केला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणं हे मी माझं नशीबच समजते. सध्या मी प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात काम करत आहे', असं इराणी म्हणाल्या.
प्रभावी व्यक्तीमत्वांचं मार्गदर्शन लाभलेल्या इराणी इतक्यावरच थांबल्या नाहीत. तर, त्यांनी यापुढे एक महत्त्वाचं विधानही केलं. 'ज्या दिवशी प्रधान सेवक नरेंद्र मोदी राजकारणातून निवृत्ती घेतील, त्या दिवशी मीसुद्धा भारतीय राजकारणातून काढता पाय घेईन', असं त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या मुलाखतीत इराणी यांनी भाजपच्या राजकीय धोरणांविषयीसुद्धा वक्तव्य केलं.
विकासाच्या मुद्द्यावर सरकारचा भर असून, एक राजकीय पक्ष म्हणून राजकारण हे करावंच लागतं, असं असलं तरीही विकासाचा मुद्दाच आमच्यासाठी (पक्षासाठी) सर्वतोपरी महत्त्वाचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आगामी लोकसभा निवडणूकांच्या बाबतीतही पक्षश्रेष्ठींचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल असंही त्या म्हणाल्या. तेव्हा आता राजकारणात स्मृती इराणी यांची कारकीर्द कुठवर चालणार आणि यापुढे पक्षाकडून त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी सोपवण्यात येणार हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.