नवी दिल्ली: देशातील विमानतळं आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी आहे. लोकं लग्नही करत आहेत. मग देशात मंदी कुठे आहे, असा अजब सवाल केंद्रीय मंत्री सुरेश आंगडी यांनी विरोधकांना विचारला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचे दावे विरोधकांकडून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. बेळगावचे खासदार असणारे सुरेश आंगडी हे रेल्वे खात्याचे राज्यमंत्री आहेत. ते शुक्रवारी उत्तर प्रदेशात रेल्वेच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नरसिंह राव- मनमोहन सिंगांचे मॉडेल वापरा'


यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचे सर्व दावे फेटाळून लावले. भारतीय अर्थव्यवस्था ही अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. विमानतळं भरलेली आहेत, रेल्वेतही गर्दी असते, लोकं लग्नसोहळेही करत आहेत. पण काही जणांना केवळ नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्यात रस आहे. दर तीन वर्षांनी अर्थव्यवस्थेतील मागणी खालावते. हा अर्थव्यवस्थेच्या चक्राचा एक भाग आहे. यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा वेग पकडते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल, असा विश्वास सुरेश आंगडी यांनी व्यक्त केला. 


नोटाबंदीची जखम कधीच भरून न येण्यासारखी- मनमोहन सिंग


मात्र, सुरेश आंगडी यांच्या या वक्तव्यावरून भाजपला टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील औद्योगिक उत्पादन आणि इतर क्षेत्रांमधील विकास निर्देशांक घसरल्याचे चित्र आहे. विशेषत: वाहननिर्मिती क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. दिवाळीच्या काळात वाहनांची मागणी वाढल्यामुळे ही घसरण थांबली होती. मात्र, वाहननिर्मिती क्षेत्र अद्याप पुरते सावरलेले नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांकडून भारताच्या विकासदराविषयी प्रतिकूल अंदाज वर्तविण्यात आले होते.