close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नरसिंह राव- मनमोहन सिंगांचे मॉडेल वापरा'

नेहरुकालीन आर्थिक ढाचा पूर्णपणे मोडीत काढल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

Updated: Oct 14, 2019, 06:11 PM IST
'अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नरसिंह राव- मनमोहन सिंगांचे मॉडेल वापरा'

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीच्या गर्तेतून बाहेर काढायचे असेल तर भाजपने नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या आर्थिक प्रारुपाचा (मॉडेल) वापर करावा, असा सल्ला सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पराकला प्रभाकर यांनी सरकारला  दिला आहे. पराकला प्रभाकर हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आहेत. 'द हिंदू' या वृत्तपत्रात सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका लेखात पराकला प्रभाकर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केले आहे. 

या लेखात पराकला प्रभाकर यांनी नेहरुकालीन आर्थिक ढाचा पूर्णपणे मोडीत काढल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली आहे. यासाठी त्यांनी भाजपच्या धुरिणांना जबाबदार धरले. भाजपच्या धुरिणांनी केवळ कोणत्या गोष्टी नकोत, हेच सांगितले. मात्र, त्यांची स्वत:ची रणनीती त्यांनी कधीच जाहीर केली नाही. भाजपच्यादृष्टीने पूजनीय असलेल्या दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानववादाचे धोरण बाजारपेठेच्या कलाने चालणाऱ्या जागतिकीकरणाच्या वातावरणात व्यावहारिक नसल्याचे मत पराकला प्रभाकर यांनी व्यक्त केले.

भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती वाईट आहे. पण सरकार ही गोष्ट मान्य करत नाही. परंतु, आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक क्षेत्रे संकटात असल्याचे स्पष्ट होत आहे. या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस रणनीती नाही. त्यामुळे आता सरकारने अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या आर्थिक प्रारुपाचा (मॉडेल) वापर करावा, असे पराकला प्रभाकर यांनी म्हटले आहे. 

पराकला प्रभाकर यांच्या लेखाविषयी निर्मला सीतारामन यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी म्हटले की, २०१४ ते २०१९ या काळात आम्ही अनेक मुलभूत आर्थिक सुधारणा केल्या. यावेळी सीतारामन यांनी जीएसटी, आधार आणि उज्ज्वला गॅस योजनेचा उल्लेख केला.