`लवकरच Pok भारतात विलिन होईल`; मोदींच्या मंत्र्याचा दावा! राऊत म्हणाले, `लष्करप्रमुख...`
PoK will merge with India: केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमधील मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हा दावा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेसंदर्भात मोठं विधान केलं आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर लवकरच स्वत: भारतामध्ये विलीन होईल. व्ही. के. सिंह यांनी राजस्थानमधील दौसा येथे पीओके लवकरच स्वत: भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार असून आपण फक्त थोड्या कालावधीसाठी वाट पाहिली पाहिजे, असं म्हटलं आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
नेमकं काय म्हणाले केंद्रीय मंत्री
भारत आणि पाकिस्तानदरम्यानची कारगिलजवळच्या सीमारेषेतून आम्हाला भारतामध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील शिया मुस्लीम करत असल्याचा दावा व्ही. के. सिंह यांनी केला आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर हा आझाद काश्मीर आणि गिल्गीट बालिस्तान अशा 2 भागांमध्ये विभागला आहे. या ठिकाणीचं लोकसंख्या 4.5 बिलियन इतकी असल्याचं बीसीसीचं म्हणणं आहे. यापैकी 97 टक्के जनता ही मुस्लीम आहे. 3 टक्के लोक हे अल्पसंख्यांकं आहेत. ज्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन लोकांचा समावेश आहे.
मोदींचं कौतुक
केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या व्ही. के. सिंह यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील शिया मुस्लिमांकडून भारतीय सीमेमध्ये प्रवेश देण्याच्या मागणीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केलं आहे. व्ही. के. सिंह हे दौसामधील भाजपाच्या परिवर्तन संकल्प यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी भारताच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या यशासंदर्भात बाष्य केलं. त्यांनी या परिषदेची भव्यता पाहून जागतिक स्तरावर भारताची एक वेगळी ओळख अखोरेखित केल्याचं म्हटलं आहे. जगभरामध्ये भारताच्या ताकदीची चर्चा असल्याचंही व्ही. के. सिंह म्हणाले.
संजय राऊत यांचा सवाल
व्ही. के. सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात केलेल्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना असं झालं तर आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करु असं म्हटलं आहे. "आम्ही कायमच अखंड भारताचं स्वप्न पाहिलं आहे. आपण कायमच पाकव्याप्त काश्मीर आपलं असल्याचं म्हणतो. मात्र जेव्हा जेव्हा ते (व्ही. के. सिंह) लष्कराचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. आता ते हे कसं करणार आहेत?" असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. राऊत यांनी चीन लडाख, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरपर्यंत पोहोचला आहे, असं म्हणत सरकारला लक्ष्य केलं.
जी-20 बैठकचं कौतुक
जी-20 बैठक ही फारच उत्तमपणे पार पडली. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं आणि आताही भारत वगळता इतर कोणत्याही देशाला अशी बैठक आयोजित करता येणार नाही असा दावा व्ही. के. सिंह यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीअंतर्गत नवी दिल्लीमध्ये शनिवारी आणि रविवारी ही बैठक पार पडली. जी-20 परिषदेमध्ये जगभरातील 20 शक्तीशाली देशांमधील नेते सहभागी झाले होते. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबरोबरच अन्य महत्त्वाच्या देशांचे प्रमुख नेते आणि वेगवेगळ्या जागतिक संस्थांचे अधिकारीही सहभागी झाले होते.