मुलायमसिंहांचे वय झालेय, त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नका- राबडी देवी
आपण काय बोलतोय, हे त्यांच्या लक्षात राहत नाही.
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त करुन समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानामुळे मोदी सरकारविरोधात एकटवत असणाऱ्या विरोधकांची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळे आता प्रत्येकानेच मुलायमसिंह यांच्या विधानापासून फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनीही गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुलायमसिंह यांच्या वक्तव्याला फारशी किंमत देण्याची गरज नसल्याचे सांगितले. मुलायमसिंह यांचे आता वय झाले आहे. आपण काय बोलतोय, हे त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नसल्याचे राबडी देवी यांनी म्हटले.
मुलायम सिंहांनी मनमोहन सिंग यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या आणि सरकार पडले- सुप्रिया सुळे
सोळाव्या लोकसभेतील शेवटच्या अधिवेशनाची बुधवारी सांगता झाली. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षांचा लेखाजोखा मांडला. यावेळी मुलायमसिंह यादव यांनी अनपेक्षितपणे मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. पंतप्रधानांनी सर्वांसोबत मिळून मिसळून काम केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे. जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्याकडे काही काम घेऊन आलो तेव्हा तुम्ही तत्काळ आदेश देऊन ते काम करून घेतले. या कार्यतत्परतेचा मी आदर करतो. माझी एवढीच इच्छा आहे की, आगामी निवडणुकीत सदनातील सर्व सदस्य पुन्हा निवडून येवोत आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होवोत, असे मुलायमसिंह यादव यांनी म्हटले होते.