लखनऊ : उन्नावमधील बलात्कार पीडित तरुणीचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. बलात्कार झाल्यापासून जिवंत जाळण्यापर्यंत त्या तरुणीच्या वाट्याला जे आले, त्यानं कुणाचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. त्या दुर्दैवी तरुणीची ही अंगावर काटा आणणारी कहाणी. तिच्या जगण्याची प्रबळ इच्छा होती. मात्र, नियतीच्या मनात वेगळे होते. ती न्याय मिळण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रारच लिहून घेतली नाही. अखेर न्यायालयात धाव घेतली आणि तिची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश तिला. तेव्हा कुठे झोपेचे सोंग घेतलेल्या पोलीस यंत्रणेला जाग आली. ही घटना घडली ती भाजपचे राज्य असणाऱ्या राज्यात आणि यात हात होता तो भाजप नेत्याचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''मी वाचेन ना..?
मला मरायचं नाही.
मी जगू शकले नाही तर आरोपींना फासावर लटकवा''


असे ती वारंवार सांगत होती. ९० टक्के भाजलेल्या अवस्थेत उन्नावमधील ती बलात्कार पीडित तरुणी आपल्या भावाला हे सांगत होती. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देता देता आपल्या भावाशी ती बोलत होती, मला मरायचे नाही. मला जगायचे आहे. मी जर जगू शकले नाही तर आरोपींना फासावर लटकवा.


खरे तर गेल्यावर्षी बलात्कार झाल्यापासूनच ती जिवंत मरणयातना भोगत होती. आधी दोघा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला, नंतर आरोपींच्या कुटुंबियांनी तरुणीवर आणि तिच्या कुटुंबियांवर अत्याचार केले आणि उरल्या सुरल्या अब्रुचे धिंडवडे बेपर्वा पोलीस यंत्रनेने काढले.


जिवंत जाळल्यानंतर ४० तास ती मृत्यूशी झुंजत होती. आधी कानपूरला, तिथून लखनौ आणि शेवटी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिला हलवण्यात आलं. या प्रवासात ती भावाला एकच गोष्ट वारंवार सांगत होती. त्या नराधमांना सोडू नका. तिला जगायचं होते, त्यांना फासावर लटकलेलं पाहायचं होतं... पण दुर्दैवानं शुक्रवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी तिची झुंज संपली. अन्यायाविरुद्ध लढणारा तिचा आवाज कायमचा बंद झाला.


घटनाक्रम 


- १२ डिसेंबर २०१८ रोजी या तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून शिवम आणि शुभम त्रिवेदी या दोघा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला.


- १३ डिसेंबर २०१८ ला तिनं तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं. पण पोलिसांनी गुन्हा नोंदवूनच घेतला नाही.


- २० डिसेंबर २०१८ ला तिनं रायबरेलीच्या पोलीस अधीक्षकांना रजिस्टर्ड पत्र पाठवून गुन्ह्याची माहिती दिली. पण तरीही गुन्हा नोंदवून घेण्यात आला नाही.


- अखेर ४ मार्च २०१९ ला रायबरेली कोर्टाच्या आदेशानंतर शिवम आणि शुभम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.


- मात्र दोघेही फरार असल्यानं १४ ऑगस्ट २०१९ संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले.


- १९ सप्टेंबर २०१९ ला आरोपी शिवम त्रिवेदी कोर्टाला शरण आला.


- २५ नोव्हेंबर २०१९ रोजी हायकोर्टानं शिवमचा जामीन मंजूर केला. ५ दिवसांना त्याची जामिनावर सुटका झाली. तर पोलीस रेकॉर्डनुसार, शुभम त्रिवेदी फरारच होता.


- ५ डिसेंबर २०१९ ला पहाटे वकिलाला भेटायला तरुणी निघालेली असताना शिवम आणि शुभमसह ५ नराधमांनी तिला वाटेत गाठले. तिला मारहाण केली आणि अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले.


एका वर्षात ८६ बलात्कार, १८५ लैंगिक अत्याचार


उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून अवघ्या ६३ किलोमीटर अंतरावर असलेले उन्नाव. या जिल्ह्यात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. उन्नाव प्रथमच चर्चेत आले ते भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर एका १७ वर्षीय तरुणीने केलेल्या आरोपांमुळे. ४ जून २०१७ रोजी सेंगर यांच्या बंगल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा तिचा आरोप आहे. त्यानंतर या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात. तरुणीला आणि वकिलाला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न झाला.


पीडितेने योगी आदित्यनाथ यांच्या घराजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. हे प्रकरण सध्या सीबीआयच्या अखत्यारित आहे. अत्याचारांची ही मालिका सुरूच आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये बलात्काराच्या तब्बल ८६ घटनांची नोंद झालीये आणि लैंगिक अत्याचाराची १८५ प्रकरणं घडली आहेत. शुक्रवारी दिल्लीमध्ये दुसऱ्या एका प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपले आहे. हा मृत्यू नैसर्गिक नाही. तिला आरोपींनीच जाळून मारले. या अत्यंत संतापजनक घटनेमुळे सार्वत्रित संतापाची भावना आहे.