वरातीत डीजेमध्ये उतरला विद्युत प्रवाह; दोन भावांसह तिघांचा मृत्यू
UP Accident News : उत्तर प्रदेशमध्ये एका वरातीमध्ये विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या घरी वरात जात असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे लग्नभरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
UP Accident : उत्तर प्रदेशच्या कौशंबी जिल्ह्यात एका लग्नघरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका लग्नघरात तिघांचा एकावेळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कौशंबीमध्ये शनिवारी रात्री वरातीमध्ये डीजे हायटेंशन वायरच्या संपर्कात आल्याने मोठा अपघात घडला. या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली आहे. तार तुटल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकाने केला आहे. जर तक्रार केल्यानंतर तार नीट केली असती तर तिघांचा जीव वाचला असता असे नगरसेवकाने म्हटलं आहे.
कौशंबी जिल्ह्यातल्या कोखराज ठाण्याच्या राम नगरमध्ये ही घटना घडली. कौशंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुल्हनियापूर गावात राहणाऱ्या पिंटूचे लग्न राम नगरमधल्या अमृता प्रजापतीसोबत होणार होते. शनिवारी रात्री नियोजित वेळेनुसार लग्नाची वरात राम नगर येथे पोहोचली. नाश्ता झाल्यावर डीजेच्या तालावर नाचत लग्नाची वरात वधूच्या घराकडे जाऊ लागली होती. त्याचवेळी हा धक्कादायक अपघात घडला.
पिंटूच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाची वरात वधूच्या घरापासून काही अंतरावर होती. त्याच दरम्यान, लग्नाच्या वरातीत असलेल्या डीजेचा रस्त्यावरून जाणाऱ्या हाय टेन्शन वायरला स्पर्श झाला. त्यामुळे डीजेमध्ये जोरदार विजेचा प्रवाह उतरला. त्यामुळे राजेश आणि रवी हे दोन सख्खे भाऊ आणि सतीश यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.
"पावसामुळे डीजेवर छत्री लावण्यात आली होती. जेणेकरून पाण्याचा एकही थेंब पडणार नाही. मृत्यूमुखी पडलेल्यांनी ती छत्री धरली होती. डीजे खड्ड्यातून जात असताना तो एक हाय टेंशन वायरच्या संपर्कात आला जी खूप खाली होती. वायरला स्पर्श झाल्याने सतीश जखमी झाला. तर डीजेच्या शेजारी उभे असलेले आणखी दोन जण जखमी झाले. तिघांनाही पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी मंझणपूरला पाठवले. मात्र तिघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवागारात पाठवण्यात आले आहे आहेत," अशी माहिती सर्कल ऑफिसर अवधेश विश्वकर्मा यांनी दिली.