Crime News: भयानक सूड! मुलाच्या खुन्याला जामीन मिळवून देत तुरुंगाबाहेर काढलं अन्...
UP Crime News: 2021 पासून आरोपी आपल्या मुलाच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी नियोजन करत होता. यासाठी त्याने आपल्याच मुलाच्या हत्या करणाऱ्याला जामीनही मिळवून दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Uttar Pradesh Crime News: चूक माफ करणारा हा चूक करणाऱ्यापेक्षा मोठा असतो असं म्हटलं जातं. अनेक गुन्ह्यांमध्ये मृत व्यक्तीचे नातेवाईक आरोपीला माफ केल्याची उदाहरणं पहायला मिळतात. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी धक्कादायक मार्ग अवलंबला. या व्यक्तीने आपल्या ओळखीतील एका वकीलाच्या मदतीने मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला जामीन मिळवून दिला आणि त्याला तुरुंगाबाहेर काढलं. त्यानंतर याच व्यक्तीने मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीवर प्राणघातक हल्ला केला. या शेतकऱ्याच्या मुलाची हत्या करणारा आरोपी हा नात्यातील व्यक्तीच होता. तुरुंगातून आरोपीला बाहेर काढून त्याची हत्या करत या शेतकऱ्याने मुलाच्या हत्येचा सूड घेतला.
विवाहबाह्य संबंधांचं प्रकरण
मितौली येथील एका 50 वर्षीय शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलाची हत्या त्याची आई आणि तिच्या कथित प्रियकराने केली होती. हा प्रियकर या कुटुंबाच्या नात्यामधील व्यक्तीच होता. शुक्रवारी हाच प्रियकर मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती ही 47 वर्षांची असून या व्यक्तीचं नावं शत्रुघ्न लाला असं आहे. लालाच्या डोक्यात 3 गोळ्या झाडण्यात आला. लालाचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या 50 वर्षीय काशी नावाच्या शेतकऱ्याने केल्याचं सांगितलं जात आहे.
नदीत मृतदेह सापडला अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीच्या पत्नीने 2021 मध्ये लालाच्या मदतीने जितेंद्र नावाच्या आपल्या मुलाची हत्या केली होती. जितेंद्रने या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं म्हणून त्यांनी ही हत्या केली असं सांगण्यात आलं. हा सर्व प्रकार घडला तेव्हा काशी अन्य एका प्रकरणामध्ये तुरुंगात शिक्षा भोगत होता. काशीला खिरी जिल्ह्यामधील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. 2020 साली स्थानिक स्तरावरील वादातून झालेल्या एका हत्या प्रकरणामध्ये काशी सहआरोपी होता. काशी तुरुंगात असतानाच 2021 साली अचानक त्याचा 14 वर्षीय मुलगा, जितेंद्र हा बेपत्ता झाला. काही दिवसांनंतर जितेंद्रचा मृतदेह गावातील नदीच्या किनाऱ्यावर सापडला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं समजून पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल करुन घेतला नाही. जितेंद्रचा मृत्यू नदीत बुडून झाला असेल असं पोलिसांना वाटलं. मात्र सत्य वेगळं होतं.
...अन् जितेंद्रचे हत्या करणारे पकडले गेले
जितेंद्रच्या मृत्यूनंतर काही कारणाने काशीची पत्नी आणि लालामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर काशीच्या पत्नीने ऑक्टोबर 2021 मध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करुन थेट न्यायालयात धाव घेतली. तपासामध्ये काशीची पत्नी आणि लाला या दोघांनी मिळून जितेंद्रची हत्या केल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या पत्नीने लालाच्या मदतीने जितेंद्रची हत्या केल्याचं काशीला समजल्यानंतर काशीने लालाची हत्या करण्याचं ठरवलं होतं.
जामीन मिळवून दिला अन्...
जितेंद्रच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी लाला आणि काशीच्या पत्नीला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आलं. त्यामुळे पोलिस कोठडीत आपल्याला लालाला मारता येणार नाही हे काशीला ठाऊक होतं. मात्र काशीला आपल्या मुलाची हत्या करणाऱ्यांचा सूड घ्यायचा होता. डिसेंबर 2022 रोजी काशी तुरुंगातून बाहेर पडला. काशीने त्याच्या ओळखीतील एका वकीलाच्या माध्यमातून लालाला जामीन मिळेल अशी व्यवस्था केली. लालाला एप्रिलच्या पाहिल्या आठवड्यामध्ये जामीन मिळाला आणि तो तुरुंगाबाहेर आला. लाला तुरुंगाबाहेर पडल्याच्या दिवसापासूनच काशी त्याच्या मागावर होता. फक्त योग्य वेळेची तो वाट पाहत होता. शुक्रवारी रात्री त्याने लालाच्या डोक्यात 3 गोळ्या घालून त्याची हत्या केली.
पुरावे सापडले
पोलिसांनी या प्रकरणामध्ये काशीविरोधात सबळ पुरावे सापडल्याचा दावा केला आहे.