Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या सुरेश कुमार योद्धा (suresh yoddha) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरेश कुमार हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासारखे दिसत होते. त्यामुळे ते बरेच चर्चेत होते. तर दुसरीकडे सुरेश कुमार योद्धा यांचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा दावा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करून केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात राजकारण तापलं आहे. एकीकडे सुरेश योद्धा यांची हत्या केल्याचा दावा होत असताना दुसरीकडे, उन्नाव पोलिसांनी (UP Police) सुरेश योद्धाच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश कुमार योद्धा हे उन्नावच्या सोहरामौ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौपई गावचे रहिवासी होते. त्याच्या पत्नीने सांगितले की, 28 जुलै रोजी सुरेश यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन भावांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत ते जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले होते. गुरुवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


पोलिसांनी तात्काळ सुरेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. सुरेश यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सपाचे कार्यकर्ते आणि नेतेही मोठ्या संख्येने शवविच्छेदनगृहात पोहोचले होते. त्यानंतर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट करुन गंभीर आरोप केले आहेत. "सपा प्रचारक म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या सुरेश ठाकूर यांच्या हत्येची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. सरकारने लवकरात लवकर दोषींवर योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन आहे," असे ट्वीट अखिलेश यादव यांनी केले आहे.



पत्नीचे गंभीर आरोप


सुरेश कुमार यांच्या पत्नीने उन्नाव पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मारहाणीनंतर त्यांनी सोहरामाऊ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट पतीला पोलीस ठाण्यातून हाकलवून दिले, असे सुरेश कुमार योद्धा यांच्या पत्नीने सांगितले. पोलिस आरोपीशी संगनमत करत असल्याचे पत्नीने म्हटलं आहे. मारहाणीच्या घटनेनंतर ती वारंवार पोलीस ठाण्यात येत होती, मात्र पोलिसांनी तिचे ऐकले नाही.


पोलिसांनी काय सांगितले?


उन्नाव पोलिसांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. "काल, 10.08.2023 रोजी दुपारी 12.00 वाजता, अचानक प्रकृती बिघडल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी सुरेश योद्धाला रुग्णालयात आणलं होतं. येथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.  मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मृत सुरेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा दिसत नाहीत. कृपया खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरवू नका," असे पोलिसांनी म्हटलं आहे.