UP Kavad Yatra: उत्तर प्रदेशमध्ये श्रावण महिन्यात कावड यात्रा निघते. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र येतात. या यात्रेत दुकानदारांना त्यांची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची नावे दुकानाबाहेर लावण्याचे आदेश यूपी सरकारने दिले आहेत. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. 
हिंदू-मुसलमानांत नव्या फाळणीचे हे धोरण असल्याची टीका राऊतांनी केली आहे. लोकसभा पराभवानंतर भाजप गोंधळल्याने अशा प्रकारची विकृती करत असल्याचे ते म्हणाले. 


मुसलमानांचे 'नाव' कसे पुसणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदूंनी हिंदूंच्या दुकानात जावे आणि मुसलमानांनी मुसलमानांच्या दुकानात खानपान करावे, हा विचार एखाद्या सडक्या मेंदूतूनच येऊ शकतो. ही धार्मिक फाळणीची सुरुवात आहे. पंतप्रधान मोदी यांनी एकदा सांगितले आहे, "माझे बालपण मुस्लिम परिवारात गेले. मी त्यांच्यातच वाढलो आणि मोठा झालो. माझ्या शेजारी मुस्लिम कुटुंबे राहत होती. 'ईद'च्या वेळी आम्ही घरात जेवण बनवत नसू. कारण शेजारच्या मुस्लिम परिवारातून आमच्याकडे जेवण येत असे." त्याच मोदींच्या काळात दुकानांवर, हॉटेल्सवर जात-धर्मानुसार नावे लावण्याचे फर्मान सुटले. कावड यात्रेवरील रस्त्यावरील हॉटेल्समधील मुस्लिमांची नावे बाहेर लावतील, पण या देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात मुसलमानांचे 'नाव' आहे, ते कसे पुसणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.


यूपीत मुख्यमंत्री योगी विरुद्ध अमित शहांचा गट 


लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या अंतर्गत गोटातील युद्ध सुरू झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. आपणच कसे हिंदुत्वाचे चौकीदार याची चढाओढ आपापसातच सुरू आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी विरुद्ध अमित शहांचा गट यांच्यात सध्या युद्ध सुरू झाले आहे. भाजपचे हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदू आणि मुसलमानांत दंगली घडविण्यापुरते मर्यादित आहे. हे जातीय झगड्याचे हिंदुत्व उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी हद्दपार केल्याचेही राऊत म्हणाले. 



भाजपकडून हिंदुत्वाचे नवे प्रयोग


महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील दारुण पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने हिंदुत्वाचे नवे प्रयोग ते करू लागले आहेत. कावड यात्रेच्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवे फर्मान जारी केले. त्यानुसार यात्रेच्या मार्गावर जे धाबे, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या, फळांची-फुलांची दुकाने आहेत त्यांच्या मालकांनी स्वतः व काम करणाऱ्या नोकरांसह सर्व नावे बाहेर लावावीत, म्हणजे यात्रेकरूंचे पावित्र्य राखले जाईल. कावड यात्रेकरूंनी कोणत्या टपरीवर फलाहार करायचा, हे तो हिंदू की मुसलमान हे ठरवून केला जाईल. देशाला विभाजनाच्या दिशेने नेणारा हा निर्णय आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर, "हे शेंडी-जानव्याचे, घंटा बडवणारे हिंदुत्व आहे." लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर भाजप इतक्या खालच्या पातळीवर घसरून पडला आहे.
याचे काय करावे?


भाजपच्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन 


भाजपचे 'नेमप्लेट' छाप हिंदुत्व म्हणजे गोंधळलेल्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन असल्याची टीका राऊतांनी केलीय. लोकसभा निवडणुकीत भाजपला मुसलमान समाजाने मतदान केले नाही. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्ववाद्यांचा राग समजू शकतो, पण कालच्या महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीत एम.आय.एम., समाजवादी पार्टीच्या मुस्लिम आमदारांची मते कोणत्या हिंदुत्ववादी पक्षाने आपल्या तागडीत 'ठोक' भावात तोलून घेतली, तेसुद्धा देवेंद्र फडणवीस वगैरे नव्या हिंदुहृदयसम्राटांनी स्पष्ट करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. नारायण राणे यांच्या आमदार पुत्राने फडणवीस यांना 'हिंदुहृदयसम्राट' असे संबोधून वीर सावरकरांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सगळ्यांचाच अपमान केल्याची टीका त्यांनी केली. विदर्भातील हिंदूंनीच फडणवीस यांना नाकारल्याचे राऊत म्हणाले.