जोरात मार... शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; राहुल गांधींची भाजपवर आगपाखड
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका शाळेत 7 वर्षांच्या मुलाला पाचचा पाढा पाठ न करण्याची विचित्र शिक्षा देण्यात आली. शिक्षकाने विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांना मारहाण करायला सांगितली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) मुझफ्फरनगरमधल्या (Muzaffarnagar) एका शाळेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शाळा चालवणारी महिला शिक्षिका एका मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर मुलांना मारहाण करायला सांगत असल्याचे दिसत आहे. शिक्षिका एक एक करून इतर विद्यार्थ्यांना बोलावते आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या गालावर चापट मारायला सांगत आहे. विद्यार्थी रडत असतानाही शिक्षिका त्याला मारालायला सांगत आहे. तिथेच बसलेल्या एका व्यक्तीने हे सगळं त्याच्या मोबाईलमध्य कैद केले असून आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या व्हिडीओमुळे संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच असदुद्दीन ओवेसी यांनीही विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका खासगी शाळेतील तृप्ता त्यागी नावाच्या शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तृप्ता त्यागी एका मुलाला वर्गातील इतर मुलांना मारहाण करायला सांगत आहे. हा व्हिडिओ मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुब्बापूर गावातील आहे. तिथे तृप्ता त्यागी नावाच्या महिला शिक्षिका शाळा चालवतात. पाचचा पाढा पाठ न केल्याने या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांना मारायला सांगितले. सात वर्षाचा हा विद्यार्थ्यी शिक्षकेच्या शेजारी उभा होता. वर्गातील इतर मुले समोर बसलेली असताना तो रडत आहे. शिक्षिका तिच्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला सांगत आहे की तिने मुलाकडून पाचचा पाढा पाठ करुन घेतला होता पण तो विसरला. त्याचवेळी ती चापट मारणाऱ्या मुलांना जोरात मारायला सांगत आहे. व्हिडीओमध्ये शिक्षिका मुस्लीम मुलांबद्दलही काहीतरी म्हणत असल्याचा आरोप केला जात आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. विद्यार्थ्याला शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यासोबतच एका महिला शिक्षिकेने धार्मिक वक्तव्य केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मन्सूरपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारींना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, मुझफ्फरनगरचे मूलभूत शिक्षण अधिकारी शुभम शुक्ला यांनी म्हटलं की याप्रकरणी दोन्ही शिक्षकांवर कारवाई केली जाईल.
दरम्यान, या घटनेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "निरागस मुलांच्या मनात भेदभावाचे विष पेरणे, शाळेसारख्या पवित्र जागेला द्वेषाचा बाजार बनवणे - एक शिक्षक देशासाठी यापेक्षा वाईट काहीही करू शकत नाही. हेच रॉकेल भाजपने पसरवले आहे ज्याने भारताच्या कानाकोपऱ्यात आग लावली आहे. मुले हे भारताचे भविष्य आहेत - त्यांचा द्वेष करू नका, आपण सर्वांनी मिळून प्रेम शिकवायचे आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.