लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर गुंडांनी झाडल्या गोळ्या... थरकाप उडवणारा Video
अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या चिमुरड्या लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या झाडल्या. यात तो व्यक्ती जागीच कोसळला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Shahjahanpur News: आपल्या चिमुरड्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या (Shoot) घातल्या. यात तो व्यक्ती जागेवरच कोसळला. या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV Footage) व्हायरल झाला असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी उशीरा ही घटना घडली.
काय आहे नेमकी घटना?
अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशमधल्या (UttarPradesh) शाहजहांपूरमध्ये घडली. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाले. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाहजहांपूरमधल्या बाबूजी परिसरात मोहम्मद शोएब हा तरुण आपली लहान लेकीला खांद्यावर घेऊन बाजारात जात होता. याचवेळी दोन तरुण दुचाकीवरुन त्याच्या पुढे काही अंतरावर थांबले. तर समोर येणाऱ्या एका तरुणाने मोहम्मद शोएबवर अगदी जवळून गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून फरार झाला.
तर गोळी लागल्यानंतर मोहम्मद शोएब हा लेकीसह जागेवरच कोसळला. त्यानंतर मागून एक महिला किंचाळत शोएबच्या दिशेने धावत जात असताना व्हिडिओत दिसत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शोएबचे लग्नावरुन एका कुटुंबाशी वाद सुरु होता. त्यानंतर त्याने दिल्लीतल्या दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं. शोएबचं सुरुवातीला लग्न ठरलं होतं. पण काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाले होते. जखमी मोहम्मद शोएबला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
रॅकेटचा पर्दाफाश
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून ही टोळी त्यांच्याकडून पैसे वसूल करत होती. डेटिंग अॅपच्या माध्यमातून ही टोळी तरुणांशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना घरी बोलावून त्यांचे जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवायची. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत होती. पोलिसांकडे तक्रार केल्यास व्हिडिओ कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्रांना पाठवण्याची धमकीही दिली जात होती.
8 ऑगस्टला उत्तर प्रदेश पोलिसांकडून एक तक्रार आली. त्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. पोलिसात तक्रार करणाऱ्या तरुणाला डेटिंग अॅपच्या माध्यमातून घरी बोलावण्यात आलं. त्यानतंर घरी असलेल्या तीन ते चार लोकांनी त्याला मारहाण केली. त्याला विवस्त्र करुन त्याचे व्हिडिओ बनवण्यात आले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. पीडित तरुणाने हिम्मत करुन पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.