सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर आता खैर नाही!
आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल
लखनऊ : मॉब लिंचिंगच्या अनेक घटनांनंतर उत्तर प्रदेशातील पोलीस अधिक सतर्क झालेत. सोशल मीडियावर अफवा किंवा धार्मिक हिंसाचार पसरवण्याच्या प्रयत्नाखाली आता तुम्हाला 'राष्ट्रीय सुरक्षा कायद्या'खाली (रासुका) अटकही होऊ शकते. आरोपींविरोधात रासुका अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
लखनऊच्या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कायद्यान्वये आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध करणे, आक्षेपार्ह टीका करणे, कमेन्ट करणे... किंवा अशा आक्षेपार्ह घटनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या फॉरवर्ड करणे यांसाठीही ही कारवाई केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचा वापर करत धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न वारंवार केला गेल्याचं निदर्शनास आलंय. यामुळे अशा आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. यूपी पोलीस आपल्या सायबर सेलच्या साहाय्यानं फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटसअपवर नजर ठेवणार आहे.
यासाठी मेरठमध्ये पहिली सोशल मीडिया सेल बनवण्यात आलंय. या लॅबच्या साहाय्यानं सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येणार आहे.