नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्या जागीच कोसळल्या. त्यानंतर गोंधळाच्या वातारणात त्यांना तातडीनं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते हर्षवर्धन एम्स रुग्णालयात दाखल झालेत. तर भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात एम्समध्ये दाखल होणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आज लोकसभेतही बहुमतानं मंजूर करण्यात आलंय. सोमवारी राज्यसभेत १२५ विरुद्ध ६१ तर आज लोकसभेत ३७० विरुद्ध ७० अशा बहुमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. यावरच, मंगळवारी सायंकाळी ७.२३ वाजता सुषमा स्वराज यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हेच त्यांचं अखेरचं ट्विट ठरलं.


सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५३ रोजी झाला होता. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यासोबतच त्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकीलदेखील होत्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर सुषमा स्वराज दुसरी महिला होत्या ज्यांनी परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. १९७७ साली वयाच्या केवळ २५ व्या वर्षी त्या पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री पदही भूषवलं होतं. 


सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांपैंकी एक होत्या. भाजपाच्या महिला नेत्यांमध्ये त्यांचं स्थान वरच्या क्रमांकावर होतं. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषण शैलीसाठी त्या ओळखल्या जात होत्या. लोकसभा आणि राज्यसभेतील त्यांची अनेक भाषणं चर्चेत राहिली. 


परराष्ट्र मंत्रालयाचा भार पेलल्यानंतर २०१९ साली मात्र सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं. २००९ आणि २०१४ मध्ये मध्यप्रदेशच्या विदिशामधून निवडणूक जिंकल्या होत्या. २००९ ते २०१४ पर्यंत त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका संसदेत मांडली होती.   


काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आलीय.



माजी खासदार डॉ. उदित राज यांनी ट्विटद्वारे सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिलीय. 'भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आपल्यात नाहीत याचा अत्यंत खेद आहे' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.



काँग्रेस नेते शशी थरूर, क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनीही सुषमा स्वराज यांच्या अचानक निधनाच्या बातमीनं धक्का बसल्याचं म्हटलंय.