Upendra Singh Rawat Video : भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंग यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास नकार दिला. भाजपने गेल्या शनिवारीच पवन सिंह (Pawan Singh) यांना आसनसोल या जागेवरून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी भाजपला नकार दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं अशातच आता भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे. खासदार उपेंद्र सिंह रावत (Upendra Singh Rawat) यांनी देखील तिकीट नाकारलं आहे. नुकताच खासदार उपेंद्र सिंह रावत यांचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी निर्णय जाहीर केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले उपेंद्र सिंग रावत?


माझा एक एडिटेड व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. जो डीपफेक एआय तंत्रज्ञानाने तयार केला आहे, ज्यासाठी मी एफआयआर दाखल केला आहे. या संदर्भात, मी माननीय राष्ट्रीय अध्यक्षांना त्याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. माझा खूप अपमान झालाय, त्यामुळे आता मी निर्दोष सिद्ध होईपर्यंत सार्वजनिक जीवनात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा उपेंद्र सिंग रावत यांनी केली आहे.


एकीकडे नेते तिकीट मिळविण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू असताना 195 पैकी 2 उमेदवारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिलाय. अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी खासदारांचे प्रतिनिधी दिनेश चंद्र रावत यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी करण्यात आली. अशातच व्हायरल व्हिडीओ एडिट केल्याचं उपेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. मला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केलं जातंय, असं म्हणत उपेंद्र सिंग रावत यांनी स्पष्टीकरण दिलंय.


दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओंमध्ये परदेशी महिला दिसत आहे. तर हा व्हिडीओ 31 जानेवारी 2022 चा असल्याचं सांगितलं जातंय. भोजपुरी स्टार पवन सिंह यांची वक्तव्य महिलाविरोधी असल्याने त्यांना भाजपने राजीनामा देण्यास भाग पाडलं, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर आता उपेंद्र सिंह यांनी उचललेल्या पाऊलामुळे भाजप येत्या काळात अडचणीत सापडेल का? असा प्रश्न देखील विचारला जातोय.