UPSC Civil Exam Result: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' म्हणजेच प्रयत्नाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. पण याचं प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मैनपुरी येथील सूरज तिवारी (Sooraj Tiwari) याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवेत (UPSC Civil Exam) मिळवलेलं यश उत्तम उदाहरण आहे. जेव्हा मनात जिद्द असते तेव्हा समोर अडचणींचा कितीही मोठा डोंगर उभा असला तरी आपण त्यावर मात करु शकतो हे सूरज तिवारीने सिद्ध करुन दाखवलं आहे. दोन पाय आणि एक हात नसतानाही दुसऱ्या हाताच्या तीन बोटांच्या आधारे सूरजने युपीएससी परीक्षा दिली. इतकंच नाही तर त्याने 917 वा रँक मिळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूरज तिवारीने ट्रेन अपघातात आपले दोन पाय आणि एक हात गमावला होता. यानंतरही सूरजने हिंमत गमावली नाही. त्याने जिद्दीने युपीएससी परीक्षा दिली आणि 917 वा रँक मिळवला आहे. त्याच्या या यशावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही भुरळ घातली आहे. 


माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मैनपुरीमधील दिव्यांग सूरज तिवारीने पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा उत्तीर्ण करत आपण संकल्प केल्यास तो इतर सर्वांपेक्षा जास्त शक्तिशाली असतो हे सिद्ध केलं आहे. सूरजला या 'सूर्या'सारख्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना". 



अडचणींपुढे हात टेकणाऱ्या अनेकांसमोर सूरजने एक उदाहरण ठेवलं आहे. कितीही समस्या आल्या तरी प्रयत्न केल्यास यश नक्की मिळतं हे त्याने दाखवून दिलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सूरजला दोन पाय आणि एक हात नाही आहे. त्याच्या दुसऱ्या हाताला फक्त तीन बोटं आहेत. पण आपली एकाग्रता, कष्ट आणि जिद्दीने त्याने हे यश खेचून आणलं आहे. 


सूरज युपीएससीच्या परीक्षेसाठी 18 ते 20 तास अभ्यास करायचा. विशेष म्हणजे, सूरजने कोणत्याही कोचिंग किंवा क्लासेसला न जाता स्वत: सर्व अभ्यास केला. सूरज एक मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्याचे वडील टेलर आहेत. त्यांचं एक छोटंसं दुकान आहे. वडिलांच्या याच व्यावसयावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. 


2017 मध्ये सूरजचा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात सूरजने आपले दोन्ही पाय आणि एक हात गमावला होता. गंभीर जखमी झालेल्या सूरजवर तब्बल 4 महिने उपचार सुरु होते. त्यांच्या घराची आर्थिक स्थिती चांगली नाही. यादरम्यान सूरजच्या एका भावाचा मृत्यू झाला होता. या सर्व संकटांमुळे सूरजचं कुटुंब खचलं होतं. पण सूरजने मात्र आपलं मनोबल कमी होऊ दिलं नाही. त्याने पूर्ण जिद्दीने आणि एकाग्रतेने युपीएससीची तयारी केली. इतकंच नाही तर ती उत्तीर्णही केली.