`माझ्या पोटात बाळ आहे,` पत्नी याचना करत राहिली अन् तो भोसकत राहिला; नंतर अंगावर घातली गाडी
अमेरिकेत एका भारतीयाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नीची 17 वेळा भोसकून हत्या केल्यानंतर त्याने तिच्या अंगावरुन गाडी घातली होती.
पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील कोर्टाने भारतीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये त्याने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. फिलीप मॅथ्यू असं या भारतीयाचं नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे. मेरिन जॉय असं पीडित पत्नीचं नाव असून तीदेखील केरळची रहिवासी होती.
The Sun Sentinel च्या वृत्तानुसार, आरोपी मॅथ्यू याने आपली 26 वर्षीय पत्नी मेरिन जॉयची कार अडवल्यानंतर तिला 17 वेळा धारदार शस्त्राने भोसकलं. घटनास्थळावरुन पळ काढताना त्याने जॉयच्या अंगावरुन गाडी घातली होती. केरळच्या कोट्टयाम येथील रहिवासी असणारी जॉय रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. ती रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर हा सगळा प्रकार घडला होता.
मेरिन जॉयची हत्या केल्यानंतर ती एखादा स्पीड ब्रेकर असावी याप्रमाणे मॅथ्यूने तिच्या अंगावरुन गाडी घातली असं एका सहकाऱ्याने सांगितलं. जेव्हा मेरिनचे सहकारी तिला घेऊन रुग्णालयात धावत होते तेव्हा ती फक्त रडत होती. ती वारंवार माझ्या पोटात बाळ आहे असं त्यांना सांगत होती.
मेरिन जॉयने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या मारेकऱ्याची ओळख सांगितली होती. यानंतर पोलिसांनी आरोपी मॅथ्यूला बेड्या ठोकल्या होत्या. 3 नोव्हेंबरला मॅथ्यूने आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणी लावलेल्या आरोपांना आव्हान न देण्याचं ठरवलं. यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याव्यतिरिक्त त्याला धारदार शस्त्राचा वापर केल्याप्रकरणी 5 वर्षांची अतिरिक्त शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
आरोपांना आव्हान न देण्याच्या निर्णयामुळे त्याला मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून वाचवले गेले, असं द सन सेंटिनेलच्या अहवालात नमूद केले आहे. मेरिन जॉय मॅथ्यूसोबतचं आपलं नातं संपवण्याचाच विचार करत होती. पण त्याआधीच तिची हत्या झाली.
या शिक्षेवर बोलताना, राज्य अॅटर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्या पॉला मॅकमोहन यांनी सांगितलं की, जन्मठेपेच्या शिक्षेच्या निश्चिततेमुळे आणि या प्रकरणात अपील न करण्याच्या प्रतिवादीच्या निर्णयामुळे फाशीची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोर्टाच्या निकालानंतर, जॉयच्या नातेवाईकांपैकी एकाने सांगितलं की, "तिच्या आईला हे जाणून आनंद झाला की तिच्या मुलीचा मारेकरी त्याची उर्वरित वर्षे तुरुंगात काढेल. कायदेशीर प्रक्रिया संपली आहे हे जाणून त्यांना दिलासा मिळाला."