नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शाही भोजनासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात दाखल होताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीनं ट्रम्प दाम्पत्याचं स्वागत केलं. ट्रम्प यांच्यां दोन दिवसांच्या भारत दोऱ्याचा आज अखेरचा दिवस आहे. शाही भोजन घेतल्यानंतर ट्रम्प आज रात्री अमेरिकेला रवाना होणार आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांना राष्ट्रपतीभवनात मानवंदना देण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात जंगी स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प याचं स्वागत केलं. यावेळी ट्रम्प यांची पत्नी मेलानिया, कन्या इव्हांका उपस्थित होते.



राष्ट्रपती भवनात डोनाल्ड ट्रम्प यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. तिन्ही सैन्यदलांकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा सन्मान करण्यात आला. तिन्ही सैन्यदलांकडून ट्रम्प यांना ''गार्ड ऑफ ऑनर'' देण्यात आला. ट्रम्प यांनी सपत्निक राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्रीही उपस्थित होते.



अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती भवनातील स्टाफचीही भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांना राष्ट्रपती भवनातील माहिती देण्यात आली. राष्ट्रपती भवनला भेट दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प राजघाटला पोहोचले. राष्ट्रपिता महात्मा गांधींना त्यांनी आदरांजली वाहिली. महात्मा गांधींच्या स्मृतिंना अभिवादन केलं.  ट्रम्प यांच्यातर्फे पांढऱ्या फुलांचा भव्य पुष्पचक्र महात्माजींच्या समाधीला अर्पण कऱण्यात आला. त्यानंतर ट्रम्प दाम्पत्याने समाधीसमोर डोळे मिटून काहीवेळ स्तब्ध उभं राहून आदरांजली वाहिली.


ट्रम्प यांनी राजघाटवर महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर अभिप्राय वहीत अभिप्राय नोंदवला. त्यानंतर ट्रम्प यांना राजघाटवर महात्मा गांधीजींचा अर्धाकृती पुतळा भेट म्हणून देण्यात आला. राजघाटवरून ट्रम्प आणि मोदी हैदराबाद हाऊस इथे पोहोचले. हैदराबाद हाऊसवर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या द्वीपक्षीय चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते आणि दोन्ही देशांची शिष्टमंडळं यांच्यात चर्चा होत आहे.