LIC IPO बाबत मोठी अपडेट! गुंतवणूकदारांना १ वर्ष पाहवी लागणार वाट? अर्थमंत्र्यांची माहिती
Russia-Ukraine War effect: बहुचर्चित एलआयसीचा आयपीओची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. परंतू रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या आयपीओबाबत मोठा अपडेट येणार आहे.
मुंबई : LIC IPO : रशिया युक्रेन युद्धादरम्यान, गुंतवणूकदारांना नाराज करणारी अपडेट समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, जागतिक स्तरावर बिघडलेले अर्थकारण तसेच भारतीय बाजारातील मोठा चढ-उतार पाहता, एलआयसीचा आयपीओ एका वर्षासाठी टाळण्याचा निर्णय घेऊ शकते.
सरकार या आठवड्यात महत्वाची बैठक घेणार आहे. ज्यामध्ये एलआयसी आयपीओ यावर्षी मार्चमध्ये येणार की नाही याबाबत निर्णय होईल. जागतिक अर्थकारणाची स्थिती, भारतीय बाजारांची वाटचाल पाहूनच आयपीओ लॉंचिंगबाबत ठरवण्यात येईल.
याआधीसुद्धा सीतारमण यांनी इशारा दिला होता की, आयपीओ आपल्या ठरलेल्या वेळेतच येईल परंतू, जागतिक स्तरावर नकारात्मक घडामोडी घडल्या तर आयपीओच्या टाईमिंगबाबत पुन्हा विचार करता येईल.
गुंतवणूकदारांमध्ये चिंता
बाजारात सध्या विक्रीचा सपाटा सुरू आहे. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसात मोठी पडझड झाली आहे.