Stray Dog : देशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दगावल्याच्या घटना वाढत आहेत. पण एका घटना अशी समोर आली आहे ज्यात कुत्र्याच्या चावण्याने (Dog Bite) नाही तर चाटण्याने तरुणाचा मृत्यू झाला. यात तरुणाचा निष्काळजीपणा त्याच्या जीवावर बेतला. कुत्र्याच्या चाटण्याने तरुणाला रेबिजची लागण झाली. तरुणाने याकडे दुर्लक्ष केलं. अखेर तीस दिवसाने या तरुणाचा मृत्यू झाला. प्रकृती खालावल्याने तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
उत्तर प्रदेशमधल्या आगरा इथल्या पिनाहट गावात ही घटना घडली. या गावात राहाणाऱ्या अठरा वर्षांच्या जीतू नावाच्या तरुणाला पायाला जखम झाली होती. घरात बसला असताना परिसरातील एक कुत्रा त्याच्या घरात आला आणि पायावरची उघडी जखम जीभेने चाटू लागला. सुरुवातीला जीतूने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण बराच वेळ झाला तरी कुत्रा जखमेला जीभ लावत असल्याने जीतूने त्या कुत्र्याला हकलून लावलं. याची माहिती जीतूने आपल्या कुटुंबियांना दिली नाही. 20 ते 25 दिवसांनंतर जीतूची तब्येत बिघडू लागली. त्याच्या छातीत आणि हाडांमध्ये वेदना होऊ लागल्या.


स्थानिक डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण साधारण तीस दिवसांनंतर जीतूची तब्येत एकदम खालावली. त्यामुळे त्याला मोठ्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्याचे ब्लड इतर रिपोर्ट काढण्यात आले. यात जीतूमध्ये रेबिजची लक्षण आढळून आली. डॉक्टरांनी त्याला कुत्र्याने चावा घेतला होता का अशी विचारणा केली. यावेळी जीतूने काही दिवसांपूर्वी पायाला झालेली जखम भटक्या कुत्र्याने चाटल्याचं सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.


उपचारादरम्यान जीतूचा मृत्यू झाला. जीतूने वेळीच आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली असती तर कदाचीत त्याचा जीव वाचू शकला असता.


हाइड्रोफोबियाचं लक्षण
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित कुत्र्याच्या लाळेमध्ये रेबीजचे विषाणू असतात. जखमेला चाटल्याने रेबिजच्या विषाणूंनी शरीरात शिरकाव केला. रुग्णालावर वेळीच उपचार केले असते तर त्याचा जीव वाचला असता. रेबीज एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत नाही. कुत्रा, माकड इत्यादी कोणत्याही प्राण्याने चावल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ARV चे उपचार करा. या आजारात हायड्रोफोबिया होतो. यामध्ये रुग्णाला पाण्याची भीती वाटते. रुग्णाचा घसा कोरडा होतो आणि त्याचा आवाज कमी होऊ लागतो.