अयोध्या :  राममंदिरासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. रामलल्ला ज्या गाभाऱ्यात विराजमान होणार आहे, त्या गाभाऱ्याची वीट उद्या रचली जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ही वीट रचली जाणार आहे. त्यानंतर गाभाऱ्याचं बांधकाम सुरू होईल. कधी होणार रामलल्लाचं मुखदर्शन आणि कधी पूर्ण होणार राममंदिर हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (uttar pradesh cm yogi adityanath will to lay foundation stone of ayodhya ram mandir)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामाच्या गाभा-याची पहिली वीट रचणार आहेत. त्यानंतर गाभाऱ्याचं बांधकाम वेगानं सुरू होईल. रामलल्ला 2023 पर्यंत  गाभाऱ्यात विराजमान होतील, अशी आशा आहे. त्यानंतर मुखदर्शनाला सुरुवात होईल.  या मंदिराच्या बांधकामात महत्त्वाचा ठरणार आहे  तो दगड. मंदिर उभारणीसाठी विशेष लाल दगड वापरण्यात येणार आहे. 


जयपूरमधल्या बन्सी पहाडपूर या भागातून राममंदिरासाठी हा लाल दगड आणला जातो. मंदिरासाठी 4.70 लाख घन फुट लाल दगड लागणार आहे. खाणीतून हा लाल दगड  काढण्यासाठी जयपूरमध्ये रात्रंदिवस काम सुरू आहे. 


तीन मजली भव्य राममंदिर २०२३ पर्यंत तयार होणार आहे. हे मंदिर भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना ठरेल, असा  विश्वास स्थापत्यकारांना आहे. मंदिरातल्या स्तंभांवर रामायणातले प्रसंग कोरले जाणार आहेत. गाभाऱ्याची वीट रचली की या सगळ्या बांधकामाला ख-या अर्थानं वेग येणार आहे.