उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधल्या चित्रकूटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांस्कृतिक व पर्यटन मंत्री जयवीर सिंग यांनी चित्रकुटमधल्या एका रुग्णालयाला भेट दिली. यावेळी एक डॉक्टर एका महिलेवर उपचार करत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण धक्कादायक म्हणजे डॉक्टर ज्या महिलेवर उपचार करत होता, त्या महिलेचा आधीच मृत्यू झाला होता. मंत्र्यांना आपली तत्परता दाखवण्यासाठी डॉक्टरांनी हे त्यांच्यापासून लपवून ठेवलं होतं. इतकंच नाही तर मंत्र्यांनी आणलेली फळं या मृत महिलेच्या नातेवाईकांनाही देण्यात आली.


मंत्री बाहेर पडत असतानाच एका स्थानिक महिलेने हा सर्व प्रकार उघडकीस आणला आणि मंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली. मंत्री पुन्हा रुग्णालयात परतले आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली तसंच जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.


उत्तर प्रदेशात योगी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर काही निर्णय घेतले आहेत. यातील एक निर्णय म्हणजे 'सरकार जनतेच्या दारी'. संपूर्ण राज्यात या उपक्रमाला सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत चित्रकूट मंडळाचे प्रभारी मंत्री आणि योगी सरकारमधील पर्यटन-सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंग दोन दिवसांच्या दौऱ्यावर चित्रकूटला पोहोचले. 


मंत्री जयवीर सिंह यांनी चित्रकूटच्या जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. मंत्री रुग्णालयाची पाहणी करत असताना चित्रकूटचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भूपेश त्रिपाठी यांनी मृत महिलेची केवळ तपासणीच केली नाही तर त्यांच्या नातेवाईकांना मंत्र्यांच्या हस्ते फळांचे वाटपही केलं. चित्रकूटच्या जिल्हा पंचायत सदस्या मीरा भारती यांनी प्रभारी मंत्र्यासमोर डॉक्टरचं लाजिरवाणे कृत्य आणल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.


डॉक्टरांनी केली सारवासारव
मंत्र्यांसमोर या प्रकणाचा भांडाफोड झाल्यानंतर सुरुवातीला डॉक्टर भूपेश त्रिपाठी यांनी महिला मृत असल्याचं नाकारलं. महिला जिवंत होती आणि तिच्यावर उपचार सुरु होते, असं त्यांनी म्हटलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची सारवासारव त्यांनी केली.


डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्री जयवीर सिंग यांनी चित्रकूटच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. जिल्हा रुग्णालयात आढळलेल्या उणिवा दूर केल्या जातील, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.