उत्तर प्रदेशसहित संपूर्ण उत्तर भारतात उष्माघाताची लाट पसरली आहे. उष्माघातामुळे (Heat Stroke) अनेकांचा मृत्यू झाल्याचंही समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये (Kanpur) घडली आहे. उत्तर प्रदेस पोलीस दलातील एक हेड कॉन्स्टेबल ड्युटीवर तैनात असताना तीव्र उष्णतेमुळे चक्कर येऊन खाली कोसळला. या हेड कॉन्स्टेबलबरोबर एक पोलीस निरीक्षकही उपस्थित होता. पण त्याने हेड कॉन्स्टेबलला मदत करण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवून झाल्यानंतर पोलीस निरीक्षकाने त्याला रुग्णालयात नेलं. पण तोपर्यंत हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस प्रशासनावर प्रश्न
पोलीस निरीक्षकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हेड कॉन्स्टेबलला वेळीच रुग्णालयात उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया लोकं व्यक्त करतायत. सामान्य लोकांसाठी तप्तर सेवेत असलेला पोलीस स्वत:च्याच सहकाऱ्याच्या मदतीला धावला नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचंही बोललं जातंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 


कोण होते हेड कॉन्सेटबल
मृत हेड कॉनस्टेबलचं नाव ब्रिज किशोर सिंह असं होतं, ते उत्तर प्रदेशमधल्या झांसीमध्ये राहाणारे होते. घटना घडली त्या दिवशी ब्रिज किशोर ड्युटीवर तैनात होते. ड्युटी संपल्यानंतर ते तीन दिवसांच्या सुट्टीसाठी आपल्या झांसीतल्या घरी जाणार होते. पण तीव्र उन्हामुळे ब्रिज किशोर पोलीस स्थानकाबाहेरच चक्कर येऊन कोसळले. यावेळी पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षकही होते. ब्रिज भूषण खाली कोसळताच पोलीस निरीक्षक त्यांचा व्हिडिओ बनवू लागले. व्हि़डिओ बनवून झाल्यानंतर ब्रिज किशोर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. 


पोलीस निरीक्षकाविरोधात कारवाई होणार
कानपूरचे पोलीस अधिकारी मोहसिन खान यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्युटीवर असताना ब्रिज किशोर यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहितीही मोहसिन खान यांनी दिली आहे. 


उत्तर भारतात उष्णतेचा हाहाकार
उत्तर भारतात उष्णतेने हाहाकार माजवला आहे. गेल्या चोवीस तासात उत्तर प्रदेशमध्ये 81 तर दिल्लीत 14 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.