बिस्किट, पाण्यावर ७ दिवस १४०० किमी सायकलने प्रवास करत गाव गाठलं
सायकलने सलग ७ दिवस १४०० किमी प्रवास
नवी दिल्ली : लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आलाय. राज्याअंतर्गत आणि परराज्यात जाणाऱ्या कामगार, विद्यार्थ्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान अनेकांना आपल्या गावच्या घरी जाण्याची ओढ लागली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात आलेले तरुण कोरोना संकटातून आपण गावी कधी पोहोचू ? या विचारात असून हजारो मैलाचा प्रवास करत आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
विक्रम राय नावच्या तरुणाने आपल्या ५ मित्रांसहित सायकलने सलग ७ दिवस १४०० किमी प्रवास केला. तो गुजरातला कामानिमित्त राहत होता. अथक प्रयत्नांनतर तो उत्तर प्रदेशच्या आपल्या मूळ निवास्थानी पोहोचला. घरपर्यंतचे अंतर सायकलने कापत असताना केवळ बिस्किट, साखर आणि पाण्यावरच त्याने दिवस काढले.
सूरतमध्ये हे तरुण मजदुरी करत होते. लॉकडाऊनमुळे ते सूरतमध्ये अडकून राहीले होते. हाताला काम नसल्याने त्यांचे खाण्याचे देखील हाल होऊ लागले होते. तो आणि त्याचे मित्र उत्तर प्रदेशातील आजुबाजूच्या गावात राहतात. घरी पोहोचल्यावर विक्रमने आपले पाय मीठाच्या गरम पाण्यात टाकले. घरी सुखरुप पोहोचल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण त्याने स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतल्याने, सोशल डिस्टन्सिंग पाळत आई बाबांच्या पायांना हात देखील लावता न आल्याची खंत त्याने व्यक्त केली.
केवळ साखर, पाणी आणि बिस्किटावर त्याने दिवस काढले. पण आता घरी आल्यावर त्याच्या आवडती भेंडीची भाजी आईने त्याला खाऊ घातली.
दिल्लीतून बिहारला सायकलवरुन जाणाऱ्या एका कामगाराने मध्येच प्राण सोडल्याचे वृत्त त्याच्या घरच्यांना समजले होते. यामुळे आम्ही चिंतेत होतो असे त्याचा भाऊ सांगतो. पण विक्रम सुखरुप पोहोचल्याने आनंद झाल्याचे तो म्हणतो.
रस्त्यात कधी कोणी त्याला खायला दिलं तर कोणी झोपायची व्यवस्था केली. घरी पोहोचल्यावर १४ दिवस क्वारंटाईन होण्याचे निर्देश त्याला आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिले आहेत.
८ वर्षांपूर्वी मजुरीसाठी गाव सोडलेल्या विक्रमने आता शहरात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सर्व चकचकीत आहे. पण संकट आल्यावर आमच्यासारख्यांना उघड्यावर मरण्यासाठी सोडलं जातं अशी खंत त्याने व्यक्त केली. सध्या त्याचे पाय खूप सुजले आहेत. ६ बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या विक्रमने कंटाळून शहराकडे पाठ फिरवली आहे.