Uttarakhand : उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यातील (Chamoli District) नमामि गंगे प्रोजेक्टवर (Namami Gange Project) करंट लागून सोळा जणांचा मृत्यू झाला. या घटनेने लोकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळी खळबळ उडाली असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. विद्युत करंट लागलेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना  मृत घोषित केलं. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चमोली घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले आहेत. संतापलेल्या लोकांनी प्रोजेक्टचं काम बंद पाडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये पाच पोलिसांचाही समावेश आहे. पण प्रशासनाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चमोली जिल्हयातील अलकनंदा नदी किनाऱ्यावर नमामि गंगे प्रोजेक्टचं काम सुरु आहे. या ठिकाणी विद्युत पुरवठ्यासाठी असलेला ट्रान्सफॉर्मर आज सकाळी अचानक फुटला. यामुळे काही विद्युत पुरवठ्याच्या संपर्कात आले आणि गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाबाहेर लोकांची एकच गर्दी झाली. लोकं प्रचंड संतापली होती. 


उत्तराखंडचे (Uttarakhand) अतिरिक्त पोलीस अधिकारी वी मुरगेसन यांनी दिलेल्या माहितीनुसार एका पोलीस सब इन्स्पेक्टरसह पाच होमगार्डचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर एकूण 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 


या घटनेने लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. लोकांनी विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई मागणी संतप्त लोकांनी केली आहे. दुर्घटनेनंतर नमामि गंगेचं काम तात्काळ थांबवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. 


काय आहे नमामि गंगे प्रोजेक्ट?
गंगा नदीतलं प्रदूषण संपवण्यासाठी आणि नदी पुर्नजिवीत करण्यासाठी नमामि गंगे प्रोजेक्ट सुरु करण्याता आला आहे. गोमुखपासून हरिद्वारपर्यंत गंगी नदी 405 किलोमीटरचं अंतर वाहते. यादरम्यान नदी किनारे वसलेली 15 शहरं आणि 132 गावातील कचरा आणि करोडो लीटर सांडपाणी गंगेत सोडला जातो. त्यामुळे गंगा नदीत प्रदुषण वाढलं आहे. हे प्रदुषण रोखण्यासाठी 2017 पासून उत्तराखंडमध्ये गंगेच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणजे नमामि गंगे प्रोजेक्ट आहे.