शिमला: हिमाचल प्रदेशमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या राज्यात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कुलू आणि मनाली भागांतील नद्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. मनाली येथील बियास नदीला आलेल्या पुराचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बियास नदीच्या किनाऱ्यावर अनेक वाहनचालक ट्रक आणि बसेस उभ्या करतात. यापैकी एक बस नदीच्या पात्रात वाहून जाताना दिसत आहे. नदीच्या पाण्याचा जोर इतका आहे की, मोठी वाहनेही सहजपणे नदीपात्रात खेचली जात आहेत. हा व्हीडिओ पाहून हिमाचल प्रदेशातील भीषण पूर परिस्थितीची कल्पना येऊ शकते. 


कुलूमध्येही साधारण अशीच परिस्थिती आहे. येथेही अनेक ट्रक नदीपात्रात वाहून गेले आहेत. मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे या भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सध्या स्थानकि प्रशासनाकडून पुराचा वेढा पडलेल्या भागातून लोकांची सुटका केली जात आहे. या लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.