शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला पायलट
राफेलच्या स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये पहिल्या महिला फ्लाइट लेफ्टनंट
वाराणसी : फायटर विमान राफेलच्या (Rafale) स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये पहिल्या महिला फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह (Shivangi Singh) सामिल झाल्या आहेत. शिवांगी सिंह वाराणसीतील राहणाऱ्या आहेत. शिवांगी यांच्या आई सीमा सिंह यांनी, मुलीने जे स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण केलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
शिवांगी यांची सध्याची पोस्टिंग राजस्थानमध्ये आहे. एक महिन्याच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी पात्र झाल्यानंतर त्या राफेल संघात सहभागी झाल्या आहेत.
शिवांगी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असून शालेय शिक्षणानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात (BHU)शिक्षण घेतल्याचं सीमा सिंह यांनी सांगितलं. शिवांगी बीएचयूमध्ये नॅशनल कॅडेट कोरमध्ये 7 एअर स्क्वाड्रनचा भाग होत्या. बीएचयूमध्ये 2013 ते 2015 पर्यंत त्या एनसीसी कॅडेट होत्या. तसंच 2013 मध्ये दिल्लीत स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये त्यांनी उत्तर प्रदेश टीमचं प्रतिनिधित्व केलं असल्याची माहिती, शिवांगीचे वडील कुमारेश्वर सिंह यांनी दिली.
2016मध्ये प्रशिक्षणासाठी त्या वायू सेना अकॅडमीमध्ये सामिल झाल्या. 16 डिसेंबर 2017 रोजी त्यांना हैदराबादमधील एअर फोर्स अकॅडमीमध्ये फायटर पायलटची पदवी मिळाली. हैदराबादमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर शिवांगी सध्या मिग-21च्या फायटर पायलट आहेत. त्यानंतर आता राफेलच्या पहिल्या महिला फ्लाइट लेफ्टनंट ठरल्या आहेत.