Vice President Election 2022: कोण आहेत विरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा?
एनडीएनंतर विरोधी पक्षाकडून ही उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
Vice President Election 2022: एनडीएनंतर आता विरोधी पक्षाने ही उपराष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे.
कोण आहेत मार्गारेट अल्वा ?
मार्गारेट अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. त्यांनी कर्नाटकातच शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मार्गारेट काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. त्यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले होते. विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. काँग्रेसने त्यांना 1975 मध्ये पक्षाचे सरचिटणीसही केले. मार्गारेट अल्वा या एकूण चार वेळा राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत. त्यानंतर 1999 मध्ये त्या लोकसभेवर निवडून आल्या.
गोवा, राजस्थानच्या माजी राज्यपाल
मार्गारेट अल्वा यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. मार्गारेट अल्वा यांनी 1969 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवले आहे. मार्गारेट अल्वा या गोवा, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंडच्या राज्यपाल होत्या.
काँग्रेसवर मोठा आरोप
नोव्हेंबर 2008 मध्ये मार्गारेट अल्वा म्हणाल्या की कर्नाटकातील काँग्रेसच्या जागा गुणवत्तेऐवजी बोली लावणाऱ्यांसाठी खुल्या आहेत. मात्र, काँग्रेसने त्यांचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अल्वा यांनी राजीनामा दिला. त्यांना अधिकृत जबाबदारीतूनही काढून टाकण्यात आले. नंतर अल्वा यांनी काँग्रेस नेतृत्वाशी असलेले मतभेद मिटवले.
जगदीप धनखड हे एनडीएचे उमेदवार आहेत
शनिवारी एनडीएने उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा केली होती. जगदीप धनखर हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत.