नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, या उत्साहाच्या भरात अनेकांकडून एअर स्ट्राईकविषयी चुकीची माहिती शेअर केली जात आहे. आज सकाळी एअर स्ट्राईकची बातमी आल्यानंतर काहीवेळातच एक व्हीडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लीपमध्ये विमानाच्या दिशादर्शन प्रणालीद्वारे दहशतवाद्यांचे बंकर्स उद्ध्वस्त केले जाताना दिसत आहेत. एअर स्ट्राईकसाठी भारतीय वायूदलाने मिराज-२००० या विमानांचा वापर केला होता. या विमानांतील लेझर गाईडेड बॉम्बनी जैश-ए-मोहम्मदचा तळ अक्षरश: बेचिराख केला होता. त्यामुळे सुरुवातीला ही क्लीप एअर स्ट्राईकचीच असल्याचा सगळ्यांचा समज झाला होता. काही प्रसारमाध्यमांनीही ही क्लीप प्रसारित केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, काही वेळातच अनेक जाणकारांनी या क्लीपच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली. तेव्हा ही व्हीडिओ गेममधील क्लीप असल्याचे सिद्ध झाले. ही व्हीडिओ क्लीप पाहताना हे व्हीडिओ गेममधील दृश्य असेल, याचा अंदाज पटकन येत नाही. मात्र, बारकाईने पाहिल्यास या व्हीडिओ क्लीपच्या बॅकग्राऊंडला इंग्रजीतील सूचना ऐकू येत आहेत. ही शंका आल्यानंतर काहीजणांनी याबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही व्हीडिओ क्लीप 'आर्मा-२' या गेममधील असल्याचे समोर आले. 



भारतीय वायुसेनेच्या 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एअर स्ट्राईक केला. यावेळी मिराज विमानांकडून तब्बल १००० किलो स्फोटके जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर डागण्यात आली. या हल्ल्यात ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र, पाकिस्तानकडून या सगळ्यावर पांघरूण घालण्यासाठी दहशतवाद्यांच्या मृतदेहांची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे.