Video : आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू नीरज चोप्राचा भाला चोरीला; पोलिसांकडून शोध सुरु
उत्तर प्रदेशात भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याचा भाला चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भरचौकातून सीसीटीव्ही असतानाही देखील हा भाला चोरीला गेला आहे. उत्तर प्रदेश पोलीस याचा शोध घेत आहेत.
Crime News : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर काही दिवसांपूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला होता. नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये (javelin) सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्याने 88.17 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक मिळवलं. जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र उत्तर प्रदेशात (UP News) नीरज चोप्राचा भालाच (Javelin) चोरीला गेला आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठच्या स्पोर्ट सिटी चौकात नीरज चोप्राचा पुतळा आहे. या चौकाच्या सुशोभीकरणादरम्यान नीरज चोप्राचा भाला फेकणारा पुतळा बसवण्यात आला होता. ज्यामध्ये नीरज चोप्राला भाला पकडून असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र आता त्याच्या पुतळ्यातून भाला गायब आहे. त्यानंतर मेरठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मेरठ शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जगज्जेता खेळाडू नीरज चोप्रा याच्या पुतळ्यावरून भाला चोरीला गेला आहे. स्पोर्टस सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हापूडच्या कमानीजवळ हा पुतळा बसवण्यात आला आहे. जवळपास एकमजली उंचीवर हा पुतळा बसवण्यात आला आहे. मात्र तरीही चोरट्यांनी तेथूनही भाला पळवून नेण्यात यश मिळवलं आहे. मंगळवारी ही घटना उघडकीस येताच स्थानिक लोक तेथे जमा झाले. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला.
सीसीटीव्ही असतानाही भाला केला गायब
दरम्यान, मेरठचा मुख्य चौक असलेल्या हापूर अड्ड्याचे सुशोभीकरण मेरठ विकास प्राधिकरणाने केले होते. प्राधिकरणाने स्पोर्टस सिटीच्या चौकात भाला फेकणारा नीरज चोप्राचा पुतळा बसवला आहे. यासोबतच क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, तिरंदाजी, अॅथलेटिक्स खेळाडूंचे पुतळेही बसवण्यात आले. हापूर चौकात मोठ्या प्रमाणात शासकीय व निमसरकारी संस्थांचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. एवढे सगळे असूनही नीरज चोप्रा यांच्या पुतळ्याला लावलेला भाला अज्ञात आरोपींनी चोरून नेला. याची माहिती मिळताच शहरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
मेरठ शहर पोलीस आयुक्त पीयूष सिंह यांनी सांगितले की, भाला चोरीला गेलेला नाही. ट्रकचालकामुळे भाला तुटला आहे. चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यास तपासानंतर कारवाई केली जाईल.