नवी दिल्ली : गुजरातमधील गिर अभयारण्यात बाईकस्वारांनी केलेल्या कृत्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही बाईकस्वार अभयरण्यात बाईक घेऊन शिरतात आणि त्यानंतर ते चक्क सिहांचा पाठलाग करतात. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर अभयरण्याने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांचाही शोध घेण्यात येत आहे. तसेच, हा व्हिडिओ नेमका कुणी शूट केला त्याचाही तपास करण्यात येत आहे. बाईकस्वारांनी केलेल्या या कृत्यामुळे प्राणिप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे.


फेसबुकच्या एका पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत दोन बाईकवर चार तरुण दिसत आहेत. हे तरुण गिर अभयारण्यातील सिंहांना पाहून थांबतात त्यानंतर ते तरुण सिंहांचा पाठलाग करण्यास सुरुवात करतात. बाईक आपल्या जवळ येत असल्याचं पाहून सिंह तेथून पळतात. त्यानंतर बाईकस्वारही त्यांचा पाठलाग करतात.



हा व्हिडिओ नेमका कधी शूट करण्यात आला होता याची माहिती समोर आलेली नाहीये. बाईकच्या नंबरच्या आधारे पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. बाईकवर लिहीलेल्या नंबरच्या आधारे या बाईक्स राजकोट मधील असल्याची माहिती समोर आली आहे.


तसेच, आयपी अॅड्रेस ट्रेस करत या व्हिडिओच्या सोर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन बाईकस्वार तरुणांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.