Video: `आम्ही चोर पकडतो आणि...`; भ्रष्टाचाराचा आरोप करत पोलीसच रस्त्यावर झोपला
Punjab Police Viral Video: या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंजाब पोलिसांचेच दोन कर्मचारी एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. हा वाद सुरु असताना अचानक एकजण रस्त्यावर आडवा पडतो. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनासमोर हा कर्मचारी आडवा पडतो आणि आरडाओरड करु लागतो.
Punjab Police Viral Video: पंजाबमधील जालंधर येथे शनिवारी पठाणकोड राजमार्गावर एक विचित्र प्रकार घडला. या महामार्गावरील वाहतूक एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे ठप्प झाली असं सांगितल्यास तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांकडून केला जाणारा कथित भ्रष्टाचार आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांविरोधात कारवाई केली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत रस्त्यावर लोळत आंदोलन केलं. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
व्हायरल व्हिडीओमध्ये होम गार्ड असलेला जवान पोलिसांवर गंभीर आरोप करत आहे. आम्ही जेव्हा चोरांना पकडून आणतो तेव्हा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी त्यांना लाच स्वीकारुन सोडून देतात असा आरोप केला आहे. रस्त्याच्या मध्यभागी लोळत हा पोलीस कर्मचारी पंजाबी भाषेत आपलं गाऱ्हाण मांडत आहे. "मी चोरांना पकडून आणतो. आम्हा गुन्हेगारांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो तेव्हा तेथील पोलीस कर्मचारी पकडलेल्या गुन्हेगारांना पैसे घेऊन सोडून देतात," असं हा कर्मचारी सांगत आहे. व्हायरल क्लिपमध्ये हा पोलीस कर्मचारी वाहनांना थांबवताना दिसत आहे. वाहने रोखून धरण्यासाठी हा कर्मचारी रस्ता आडवून धरण्याच्या हेतूने रस्सी खेचताना दिसतोय. अन्य एक सहकारी त्याला असं करु नको असं सांगताना दिसत आहे. यानंतर आरोप करणारा हा कर्मचारी रस्त्यावरील एका बससमोर आडवा पडतो. या पोलीस कर्मचाऱ्याचा सहकारी त्याला हायवेवरुन बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो. या व्यक्तीला बाजूला काढताना त्याचा सहकारी त्याला लाथ मारताना दिसतो. मात्र हा कर्मचारी रस्त्यावर पडून आपण बाजूला हटणार नाही याच भूमिकेत दिसत आहे.
लाथ मारली?
आपल्या सहकाऱ्यांकडून होणारा विरोध डावलून हा कर्मचारी रस्त्यावरच पडून राहण्याचा प्रयत्न करतो. या साऱ्या गोंधळामुळे वाहतूककोंडी होते. या कर्मचाऱ्याचा सहकारी हाताला पकडून त्याला उभं करण्याचा प्रयतन करतो. या दोघांमध्ये वाद होतो. मात्र तरीही हा कर्मचारी बाजूला सरकत नसून वाहतूककोंडी वाढत असल्याचं पाहून या कर्मचाऱ्याला त्याचा सहकारी लाथ मारतो. या कर्मचाऱ्याला रस्त्यावरुन उठवण्यासाठी बस थोडी पुढे येते. मात्र हा कर्मचारी रस्त्यावर पडूनच असतो. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा सारा प्रकार जालंधरमधील भोगपूर येथील पठाणकोट हायवेवर घडला आहे. गोंधळ घालणाऱ्या कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वीच या होमगार्डने एका चोराला अटक केली होती. भोगलपूर पोलीस स्टेशनमध्ये या चोराला अटक करुन ठेवण्यात आलेलं.
लाथ मारल्याचा आरोप फेटाळला
भोगलपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सुखजीत सिंग यांनी, "एका भांडणाच्या प्रकरणामध्ये हा होम गार्ड एका तरुणाला पोलीस स्टेशनला घेऊन आळा होता. या व्यक्तीने जमीनासाठी अर्ज केलेला. जामीन मंजूर झाला. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं," अशी माहिती दिली. या होम गार्डला लाथ मारण्यात आली नाही असंही सिंग यांनी सांगितलं.