Tamil Nadu News : तामिळनाडूतील (Tamil Nadu) सेलममध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात (Accident News) एवढा भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला. बुधवारी पहाटे हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली गाडी महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून धडकली. या गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. गाडीमध्ये एकाच कुटुंबातील लोक प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवार, 6 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील सेलम येथे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सेलम-कोइम्बतूर राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पेरुंथुराईकडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या व्हॅनने मागून ट्रकला धडक दिली.


मृतांमध्ये एका वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश


तामिळनाडूतील येंगूर येथील एक कुटुंब गाडीतून पेरुनथुराईला निघाले होते. सेलम-इरोड महामार्गावर पहाटे 4 वाजता गाडी भरधाव वेगात होती. त्यानंतर ती थेट महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका लॉरीच्या मागून जोरात धडकली. गाडीमधील आठ जणांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. त्याच्या आई आणि वडिलांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 



तर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ही घटना रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गाडीचा चालक विघ्नेश आणि प्रिया अशी अपघातातून बचावलेल्यांची नावे आहेत. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.