Allahabad University Student Death : अलाहाबाद विद्यापीठातील (Allahabad University) विद्यार्थी आशुतोष दुबे याच्या आकस्मित मृत्यूमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. आशुतोषच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अलाहाबाद विद्यापीठात बुधवारी गोंधळ घातला. विद्यार्थी संघाच्या इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला आहे. अचानक घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी विद्यापिठाच्या कार्यालयात घुसून फायली फाडल्या आणि तोडफोड केली काही विद्यार्थ्यांनी महिला प्राध्यापिकेला पकडून कार्यालयाबाहेरही हाकलून दिले. या सर्व प्रकारामुळे विद्यापीठात मोठा गदारोळ उडाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यापिठामध्ये बुधवारी आशुतोष कुमार दुबे या विद्यार्थ्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे विद्यार्थ्यांचा संताप उसळला आहे. विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संतप्त विद्यार्थ्यांनी लायब्ररी हॉलबाहेर निदर्शने केली. विद्यार्थ्यांच्या या धरणे आंदोलनात मृत विद्यार्थ्याचे वडील गणेश शंकर दुबे हे देखील सहभागी झाले होते. जवळपास पाच तास हा गोंधळ सुरु होता. विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत काही विद्यार्थ्यांनी सकाळी हिंदी, संस्कृत, शारीरिक शिक्षण विभाग आणि प्रॉक्टर कार्यालयाची तोडफोड केली आणि रजिस्टर्स फाडले. त्यानंतर शिक्षकांचे हात खेचून त्यांना विभागाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही शिक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.


संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी विद्यार्थी संघटनेच्या इमारतीसमोर ठिय्या मांडून गोंधळ सुरू केले होते. आशुतोषच्या कुटुंबीयांना 50 लाखांची भरपाई द्यावी, कुलगुरू, कुलसचिव यांच्यावर कारवाई करावी या मागण्यांवर विद्यार्थी ठाम होते. तोडफोड झाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आले. पोलिसांच्या कडक कारवाईनंतर गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथून पळ काढला.



कसा झाला आशुतोषचा मृत्यू?


मंगळवारी दुपारच्या सुमारास आशुतोष विद्यापीठ परिसरात बसवलेल्या आलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी प्यायला होता. त्यानंतर तो तेथेच बेशुद्ध पडला. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली, मात्र अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. त्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये ई-रिक्षा आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा नियमांचे कारण देत अधिकाऱ्यांनी त्यालाही विरोध केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आशुतोषला बाईकवरुन रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर आशुतोषच्या वडिलांनी विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप लावले आहेत.


दरम्यान, आंदोलक विद्यार्थी आणि  गणेश शंकर दुबे यांनी विद्यापीठ प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. यासोबत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.