Chandrayaan 3 : चांद्रयान - 3 मोहिमुळे जगभरात भारताचा कौतुक होत आहे. त्यानंतर आता देशाने सूर्याच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र दुसरीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. विरोधकांप्रमाणे आता सामान्य जनताही बेरोजगारीच्या मुद्दयावरुन सरकारला जाब विचारत आहे. अशातच लोकांनी काम मागितल्या नंतर हरियाणाच्या (Haryana) मुख्यमंत्र्यांनी (Manohar Lal Khattar) दिलेल्या उत्तरामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा जाहीर कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या हिस्सारमधील आयोजित सार्वजनिक संवाद कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री खट्टर रोजगाराच्या प्रश्नाला उत्तर देताना चांद्रयान-4 वर महिलांना पाठवण्याबद्दल बोलत आहेत. या व्हिडिओवरून मनोहर लाल खट्टर यांच्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे.


हिसारच्या जनसंवाद कार्यक्रमादरम्यान एका महिलेने मागणी केली की, 'तुम्ही इथे कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आम्हा महिलांना काम करता येईल. आम्हाला रोजगार मिळवून द्या.' महिलेच्या या मागणीवर मुख्यमंत्री खट्टर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पुढच्या वेळी चांद्रयान 4 चंद्राच्यावर जाईल तेव्हा त्यात पाठवून देऊ, असे खट्टर म्हणाले. मुख्यमंत्री खट्टर यांचे उत्तर ऐकून उपस्थित लोक हसू लागले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी महिलेला खाली बसायला सांगितले. मात्र मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध केला जात आहे.


सरकार जनेतेची चेष्टा करत आहे - आप


आम आदमी पार्टीने ट्विटर अकाऊंटवरून मुख्यमंत्री खट्टर यांच्यावर निशाणा साधला आहे. "पुढच्या वेळेस चांद्रयान जाईल, त्यात आम्ही तुम्हाला पाठवू. लाज वाटली पाहिजे अशा मुख्यमंत्र्यांना. ज्यांना जनतेने सेवेसाठी निवडून दिले, तेच आज जनतेची चेष्टा करत आहेत. महिलेचा गुन्हा हाच की तिने रोजगार मागितला. ही मागणी मोदींच्या अब्जाधीश मित्रांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी केली असती, तर खट्टर साहेबांनी संपूर्ण सरकारला त्यांच्या सेवेत बसवले असते," असे ट्वीट आपने केले आहे.



काँग्रेसची सडकून टीका


"बघा भाजपच्या मुख्यमंत्र्यांची विचारसरणी. हरियाणातील एका महिलेने मुख्यमंत्री खट्टर यांना त्यांच्या भागात कारखाना सुरू करण्यास सांगितले जेणेकरून त्यांना आणि इतर महिलांना काम मिळू शकेल. याला उत्तर देताना मुख्यमंत्री चेहऱ्यावर हास्य आणत म्हणतात - पुढच्या वेळी तुम्हाला चांद्रयानाने चंद्रावर पाठवले जाईल. त्या गरीब स्त्रीच्या रास्त मागणीची चेष्टा करताना तिला खाली बसण्याची सूचना केली जाते. खट्टर यांनी भाजप आणि आरएसएसला जे वाटते तेच केले," अशी टीका काँग्रेसने केली आहे.