नवी दिल्ली: भारतीय बँकांचे तब्बल ९००० कोटी रूपये बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारताच्या सोपवले जाण्याची शक्यता आहे. सोमवारी लंडनच्या वेस्टमिनिस्टर न्यायालयात भारताने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआय व सक्तवसुली संचलनलयाचे (ईडी) संयुक्त पथक इंग्लंडला रवाना झाले आहे. सीबीआयचे अतिरिक्त संचालक ए. साई मनोहर या पथकाचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वी मल्ल्या प्रकरणाची सूत्रे राकेश अस्थाना यांच्याकडे होती. 
 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्याची विजय मल्ल्याची विनंती फेटाळून लावली होती. तसेच विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीसही बजावली होती. या नोटीसीवर न्यायालयाने केंद्राचा अभिप्राय मागवला आहे. 


विजय मल्ल्याला ब्रिटनमध्ये गेल्यावर्षी अटक झाली होती. तो सध्या जामिनावर आहे. तसेच त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासंबंधीही याचिका सुरू आहे. अटक झाली याचाच अर्थ तो फरार नाही. यामुळे ‘फरार गुन्हेगार’ हा शब्द काढावा, असे त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. मात्र, विजय मल्ल्याने बँकांच्या कर्जाची परतफेड न करता देशातून पळ काढला आहे. त्यामुळे त्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करावे, अशी विनंती ईडीने या न्यायालयाला केली होती. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे.