लंडन : भारतीय बँकांचे पैसे बुडवून इंग्लंडला पळालेल्या विजय माल्ल्याने केंद्र सरकारला नवी ऑफर दिली आहे. मी भारतीय बँकांचे १०० टक्के पैसे परत करायला तयार आहे, पण माझ्याविरुद्धचे खटले बंद करा, असं विजय माल्ल्या म्हणाला आहे. या मागणीचा संदर्भ माल्ल्याने केंद्र सरकारने दिलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजशी लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोरोनासाठी आर्थिक पॅकेज दिल्याबद्दल भारत सरकारचं अभिनंदन. ते हव्या तेवढ्या नोटा छापू शकतात, पण बँकांचे १०० टक्के पैसे परत देऊन छोटी मदत करु इच्छिणाऱ्या माझ्या ऑफरकडे दुर्लक्ष केलं जात आहे,' असं ट्विट माल्ल्याने केलं आहे. बंद पडलेल्या किंगफिशर एयरलाईन्सचा मालक असणाऱ्या विजय माल्ल्यावर भारतीय बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे.



दुसरीकडे इंग्लंडमध्ये असलेल्या विजय माल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने माल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यात यावं, असे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयात जायला माल्ल्याला परवानगी मिळाली नाही, त्यामुळे आता माल्ल्यापुढचे सगळे कायदेशीर मार्ग बंद झाले आहेत.


भारत आणि इंग्लंडमधल्या करारानुसार आता इंग्लंडच्या गृहमंत्री प्रिती पटेल न्यायालयाचा आदेश प्रमाणित करतील आणि २८ दिवसात माल्ल्या भारतात परत येईल, त्यामुळे पुढच्या ३० दिवसांमध्ये माल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण व्हायची शक्यता भारतीय यंत्रणांनी वर्तवली आहे.