लंडन : भारतीय बँकांचे पैसे बुडवून इंग्लंडला पळालेल्या विजय माल्ल्याचं कोणत्याही क्षणी भारतात प्रत्यार्पण होऊ शकतं, अशी माहिती भारतीय तपास यंत्रणांमधल्या सूत्रांनी दिली होती. पण आता यामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. आणखी काही कायदेशीर प्रक्रिया बाकी असल्यामुळे माल्ल्याला लगेच भारताकडे सोपवण्यात येणार नसल्याचं युके सरकारने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'विजय माल्ल्याचा प्रत्यार्पणाविरुद्धचा खटला युकेच्या कोर्टाने फेटाळून लावला, यानंतर तिथल्या सुप्रीम कोर्टानेही सुनावणी करायला नकार दिला. पण यानंतरही आणखी काही कायदेशीर मुद्दे सोडवणं गरजेचं आहे, त्यानंतरच माल्ल्याचं प्रत्यार्पण करता येईल', असं ब्रिटनच्या भारतातल्या उच्च आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं. 



इंग्लंडमधल्या कोर्टाने माल्ल्याच्या भारतातल्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. नियमानुसार माल्ल्याला त्या दिवसापासून २८ दिवसांमध्ये इंग्लंडमधून भारतात आणायचं आहे, त्यामुळे २० दिवस आधीच निघून गेले आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत माल्ल्या भारतात परत येईल, असं भारतीय तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं होतं. 


बंद पडलेल्या किंगफिशर एयरलाईन्सचा मालक विजय माल्ल्यावर भारतातल्या १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. २ मार्च २०१६ साली विजय माल्ल्या भारत सोडून ब्रिटनला पळाला. भारतीय तपास यंत्रणांनी इंग्लंडमधल्या कोर्टात माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोठी कायदेशीर लढाई लढली. यानंतर १४ मेरोजी इंग्लंडच्या कोर्टात माल्ल्याच्या प्रत्यार्पणावर अंतिम शिक्कामोर्तब झालं. विजय माल्ल्याची १३  हजार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने आधीच जप्त केली आहे.