वैयक्तिक विकासाऐवजी संपूर्ण समाजाचा विकास साधायचा, तर त्यासाठी प्रमुख सामाजिक कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोचायला हव्यात. या हेतूनेच भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत 'विकसित भारत संकल्प यात्रा' सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत झालेल्या विकासाचा मागोवा घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील प्रतिनिधी सध्या वेगवेगळ्या राज्यांना भेटी देत आहेत. त्या अंतर्गतच महाराष्ट्रातील काही माध्यम प्रतिनिधींनी नुकतीच भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून ओदिशाला भेट दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंतप्रधान उज्ज्वला योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना, पंतप्रधान मुद्रा योजना, तसंच पंतप्रधान आवास योजना, यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत कशापद्धतीने पोचवल्या जात आहेत आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांना त्याचा कसा फायदा होत आहे ते जाणून घेणं हा या भेटीमागचा उद्देश होता. 



ओदिशामध्ये ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये जवळपास 105 संकल्परथ कार्यान्वित आहेत. या संकल्परथांच्या माध्यमातून या योजना जनतेपर्यंत पोचवण्याचा आणि लाभार्थ्यांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या 'विकसित भारत संकल्प यात्रे' अंतर्गतच कटकमधील टांगी येथील कोत्साही या गावाला भेट देऊन तेथील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची मतं जाणून घेण्यात आली. तर पुरी जिल्ह्यातील निमापाडा तालुक्यातील आधीनसाय या तुलनेनं निमशहरी भागाला भेट देऊन लाभार्थ्यांपर्यंत पोचलेल्या विकासकामांची माहितीही घेण्यात आली.



केंद्रसरकार वेगवेगळ्या समाजोपयोगी योजना राबवत असतं, मात्र अनेकदा त्या लोकांपर्यंत पोचतच नाहीत. त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचाव्यात आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी यासाठीच येत्या 26 जानेवारीपर्यंत 'विकसित भारत संकल्प यात्रा' सुरू राहणार आहे.