Indian Railways: 10 महिन्यांच्या मुलीला भारतीय रेल्वेत मिळाली नोकरी, वाचा नेमकी काय आहे घटना
भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना
Compassionate Appointment: सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्त्वावर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्याची भारत सरकारची योजना आहे. सरकारी नोकरीत असलेल्या पती किंवा पत्नीचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला नोकरीत प्राधान्य दिलं जातं.
भारतीय रेल्वेतही कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाते. तसंच, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त झाले आहेत किंवा वैद्यकीयदृष्ट्या अक्षम/अवर्गीकृत आहेत अशा लोकांना ही नोकरी दिली जाते. त्याचा उद्देश कर्मचाऱ्याला आर्थिक मदत करणं हा आहे. पण याला काही नियम आणि अटी आहेत.
सर्वसाधारणपणे, अनुकंपा तत्त्वावर व्यक्तींची नियुक्ती घडल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीत केली जाते. काही प्रसंगात पाच वर्षांचा हा कालावधी महासंचालक, RDSO यांच्या संमतीने सूट दिली जाऊ शकते.
10 महिन्याच्या मुलीला नोकरी
पण भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका 10 महिन्यांच्या बाळाची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये रस्ता अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला. त्यांना दहा महिन्यांची मुलगी आहे. तिच्या भविष्याचा विचार करुन भारतीय रेल्वेने तिला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचं ठरवलं आहे.
या योजनेंतर्गत मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिला भारतीय रेल्वेत रुजू होता येणार आहे. मुलीचे वडिल राजेंद्र कुमार भिलाई इथल्या रेल्वे यार्डात सहाय्यक पदावर काम करत होते.