कुत्र्याला मास्क घालण्यास सांगितल्याने राग अनावर, गर्भवती महिलेसोबत लिफ्टमध्ये...
Noida Lift Dog Fight: `ती गर्भवती महिला आहे. जर तिला कुत्रा चावला तर तिला किती इंजेक्शन्स द्यावी लागतील`, असे एक इसम म्हणाताना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे.
Noida Lift Dog Fight: मुंबई, पुणे, नोएडासारख्या अनेक शहरांमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना समोर येत असतात. वारंवार येणाऱ्या या तक्रारींमुळे नोएडा प्राधिकरणाने कठोर पावले उचलली असून दंडाची घोषणा केली. प्राधिकरणाच्या या घोषणेनंतर नोएडामध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये निश्चितच घट झाली आहे. मात्र, इतरांच्या सुरक्षेची काळजी न करता आजही अनेक लोक सोसायटीच्या लिफ्टमध्ये असुरक्षितपणे कुत्रे घेऊन जात आहेत, त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे.
नोएडामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये एक महिला आपल्या पाळीव कुत्र्यासोबत लिफ्टमध्ये चढताना दिसत आहे. महिलेने तिच्या कुत्र्याला मास्कही घातलेला नव्हता. लिफ्टमध्ये चढलेल्या एका गर्भवती महिलेने आणि एका पुरुषाने महिलेला तिच्या कुत्र्याला मास्क घालण्यास सांगितले. तेव्हा कुत्र्याची मालकीण असलेल्या महिलेला राग आला. कुत्राकोणालाही चावू नये, या उद्देशाने गर्भवती महिलेने त्याला मास्क घालण्यास सांगितले. पण दुसऱ्या महिलेने प्रकरण नको तितके वाढवले आणि तिच्या कुत्र्याला मास्क घालण्यास नकार दिला.
'मी कुत्र्याला मास्क घालणार नाही'
'ती गर्भवती महिला आहे. जर तिला कुत्रा चावला तर तिला किती इंजेक्शन्स द्यावी लागतील', असे एक इसम म्हणाताना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे. 'समाजात किती समस्या निर्माण होत आहेत हे तुम्ही पाहिले नाही. तुम्हाला थोडी अक्कल आहे का? कुत्रे चावल्यावर सीसीटीव्ही फुटेज वृत्तवाहिन्यांवर चालवले जातात' असे गरोदर महिला म्हणताना दिसत आहे.
उत्तरात ती महिला म्हणते की, 'तुमच्यासारखे लोकच न्यूज चॅनल चालवतात. नाहीतर गावातल्या लोकांना कुत्रे अजिबात चावत नाहीत. तुमच्यासारख्या लोकांनाच कुत्रे चावतात.'
ती महिला एवढ्यावरच थांबत नाही. तर 'मी कुत्र्याला मास्क घालणार नाही' असेही ठणकावून सांगते.
यूजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया
गर्भवती महिलेला दिलेल्या अशा वागणुकीमुळे दुसऱ्या महिलेवर यूजर्स भडकले आहेत. या कृत्यामुळे सोशल मीडिया यूजर्सचा संतापही उसळलेला पाहायला मिळतोय.'या महिलेला तुरुंगात पाठवले पाहिजे', असे एका युजरने म्हटले आहे.
'ही उद्धट स्त्री कुत्र्याला मास्क घालू शकत नाही. एवढा द्वेष मनात ठेवून हे तथाकथित फॉरवर्ड क्लास प्राणीप्रेमी कसे जगतात? असे एका महिला यूजरने म्हटले आहे.
काही युजर्सही असेही आहेत ज्यांनी महिलेला पाठिंबा दिला. एका यूजरने लिहिले की, 'हा निष्पाप (कुत्रा) माणसांपेक्षा जास्त धोकादायक नाही. तो कोणालाही इजा करत नाही तिथे उभा आहे. पण मास्क घालण्यासाठी बोलणारी बाई कदाचित यापेक्षा जास्त धोकादायक आहे.