Jammu Kashmir Avalanche Viral Video: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ देशाच्या उत्तरेकडील राज्यांकडे असतो. त्यातही जम्मू काश्मीरला अनेकांचीच पसंती. मागील काही दिवसांपासून देशाच्या या भागाला असणारी हिमवृष्टीची प्रतीक्षा संपली आणि अखेर पृथ्वीवरचं नंदनवन अशी ओळख असणारा हा प्रदेश खऱ्या अर्थानं बहरला. पण, तिथं घोंगावणारं एक संकट समोर आलं आणि पाहणाऱ्यांचाही थरकाप उडाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होतोय हिमस्खलानाचा व्हिडीओ 


श्रीनगर- लेह महामार्गावर गुरुवारी सोनमर्ग येथे अतिप्रचंड हिमस्खलन झालं आणि पाहता पाहता येथील बराच भाग सफेद धुरळ्यानं एका क्षणात गिळला. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणांनी दिली आहे. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण 


सोनमर्ग येथे झोझिला बोगद्याच्या बांधकामासाठी सुरु असणाऱ्या एका कार्यशाळेतूनच हिमस्खलनाची ही थरकाप उडवणारी दृश्य कॅमेरामध्ये कैद करण्यात आली. ज्यामध्ये डोंगरमाध्यावरून एक भलामोठा हिमकडा कोसळून त्यामुळं सफेद धुळीचे लोट उठत असल्याचं पाहायला मिळालं. पाहता पाहता हे हिमस्खलन अतिप्रचंड वेगानं डोंगरउतारावरून मैदानी क्षेत्रांपर्यंत पोहोचलं आणि तिथं असणारी प्रत्येक लहानमोठी गोष्ट या धुरळ्यानं उध्वस्त केली. सोशल मीडियावरही या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले. 



फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच जम्मू काश्मीर भागात थंडीचा कडाका वाढला आणि बहुतांश भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली. ज्यामुळं वाहतुकीपासून जनजीवनावरही याचे परिणाम झाले. या भागातील हवामानाची स्थिती पाहता यंत्रणांनी नागरिक आणि पर्यटकांच्या हितासाठी हिमस्खलनाचा धोका असणाऱ्या भागांमध्ये न जाण्याचे निर्देश जारी केले. 


बुधवारपासूनच काश्मीरच्या खोऱ्यातील बहुतांश गावांमध्ये तापमान उणे 5 हूनही कमी झालं. पहलगाम, गुलमर्ग येथे हा आकडा उणे 10 अंशांवर पोहोचला होता. या एकंदर परिस्थितीमध्ये सध्या येथील स्थानिक आणि पर्यटकांना प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे.