लाथा-बुक्क्या, दांडक्याने मारहाण! दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भररस्त्यात `दे दणादण` Video व्हायरल
Police Fight Video: पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झालेली आपण अनेकवेळा पाहिला असेल. पण दोन पोलिसांमध्येच कधी हाणामारी झाल्याचं पाहिलंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात दोन पोलिसांमध्ये चक्क फ्री स्टाईल हाणामारी सुरु असल्याचं दिसतंय.
Police Fight Video: दोन गटात किंवा दोन व्यक्तींमध्ये झालेली हाणामारी सोडवताना, वातावरण शांत करताना आपण पोलिसांना (Police) अनेक वेळा पाहिलं आहे. पोलिसांच्या मध्यस्तीने अशा अनेक घटना शांत झाल्यात. पण कधी पोलिसांना आपापसात मारामारी (Fighting) करताना तुम्ही पाहिलं आहे का? दोन पोलिसांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दोन पोलीस चक्क लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. इतकंच काय गुंडांना मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काठ्या ते एकमेकांवर बरसवत असल्याचंही या व्हिडिओ पाहिला मिळतंय.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नालंदा जिल्यातील आहे. इथल्या रहुई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस एकमेकांना भिडले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दोन पोलीस कर्मचारी पोलीस व्हॅन रस्त्याच्या बाजूला पार्क करुन भररस्त्यात एकमेकांशी हाणामारी करताना दिसत आहेत. एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर त्यातला एक पोलीस पोलीस व्हॅनमधून लाकडी दांडका बाहेर काढतो आणि दुसऱ्या पोलिसाला मारहाण करताना दिसत आहे. ही हाणामारी सुरु असताना त्यांच्या आसपास बघ्यांची मोठी गर्दी जमल्याचंही व्हिडिओत दिसतंय.
गर्दीतल्या काही लोकांनी पोलिसांची आपापासतली ही हाणामारी मोबाईल कॅमेरात कैद केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओवर लोकांचीही जबरदस्त कमेंट्स येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पोलीस आयुक्त अशोक मिश्रा यांच्यापर्यंतही पोहोचला. त्यांनी तात्काळ या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
भांडणाचं कारण काय?
मिळालेला माहितीनुसार अवैधी वसुलीतून मिळालेल्या पैशावरुन या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आधी बाचाबाची झाली. कोणाला किती पैसे मिळावेत यावरुन झालेला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. दोघांनीही गाडी रस्त्याच्या बाजूला लावून हाणामारी सुरु केली.
बिहारमध्ये पोलिसांकडूनच दारु तस्करी
दरम्यान, बिहारमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाईच दारुची तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे. बिहारमध्ये दारु विकणं आणि दारु खरेदी करणं कायद्याने गुन्हा आहे. पण यामुळे दारुच्या तस्करीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
दारु तस्करी रोखण्यासाठी बिहार सरकार आणि बिहार पोलिसांनी अनेक पावलं उचलली पण, यावर पूर्णपणे निर्बंध आणता आलेले नाहीत. दारु तस्करीतून मोठा पैसा मिळत असल्याने बिहार पोलिसांतीलच काही कर्मचारी यात गुंतले होते. धक्कादायक म्हणजू बिहारमधल्या हाजीपूर इथल्या पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस या तस्करीत सहभागी होते.