भोपाळ : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला एका हातगाडीवाल्याची फळं उचलून रस्त्यावर फेकत आहे. ही महिला नुसतं एक दोन फळं फेकून थांबत नाही तर ती एकामागून फळं रस्त्यावर फेकत आहे आणि तो फळवाला महिलेला असं करु नकोस म्हणून समजावत आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने या व्हिडीओ आपल्या अकाउंटवरुन शेअर केला आहे आणि युजर्सनी या महिलेला शिक्षा किंवा कारवाई करण्याबाबत देखील यामध्ये लिहिले आहे.


सुरूवातीला तुम्हाला हा व्हिडीओ पाहून प्रश्न पडेल की नक्की काय झालं असावं, परंतु तुम्ही जसा विचार करताय तसं फारसं काही मोठं झालेलं नाही. ही महिला हे सगळं करतेय ती फक्त तिच्या कारसाठी.


खरंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या या महिलेच्या कारला या फळवाल्याची गाडी खरचटली, ज्यामुळे ही महिला या फळंवाल्याचं देखील नुकसान करायचा प्रयत्न करत आहे.  या महिलच्या कारचं जे नुकसान झालं ते मी भरुन देतो असं देखील हा फळवाला तिला विनंती करत होता. परंतु ही उर्मट महिला ऐकायला तयार नाही. हा व्हिडीओ जवळील एका व्यक्तीने शुट केला आणि त्याला सोशल मीडियावर शेअर करत ही संपूर्ण घटना सांगितली. मात्र अद्याप या प्रकरणाविरोधात कोणती तक्रार दिलेली नाही.



हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भोपाळच्या जिल्हाधिकार्‍यांचे एक ट्विटरवर समोर आले आहे. त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, "भोपाळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला हातगाडीने जमिनीवर फळे फेकताना दिसत आहे. वरील बाबींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सदर महिला आणि हातगाडीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरुन योग्यती कार्यवाही करता येईल : जिल्हाधिकारी"



वापरकर्त्यांनी देखील कारवाईची मागणी केली


भोपाळ कलेक्टरच्या ट्विटवर अनेक यूजर्सनी कमेंटही केल्या आहेत. ज्यावर लोकांनीही कमेंट करुन महिलेला कडक शिक्षा करा असे सांगितले आहे, तसेच लोकांनी या महिलेवर कोणती कारवाई केली गेली किंवा या प्रकरणात पुढे काय घडलं याची माहिती आम्हाला सोशल मीडियावर कळवा असं देखील म्हटलं आहे.