Viral News: सध्याचा सोशल मीडियाचा जमाना असून तरुणांमध्ये Reel शूट करण्याची क्रेझ आहे. ट्रेंडमध्ये असणाऱ्या ऑडिओवर आपणंही रिल शूट करावं आणि ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) व्हावं यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसत असतात. यामुळेच मग सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणी डान्स करताना, शूट करताना सर्रासपणे दिसतात. पण फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात अनेकदा सोशल मीडियाच्या आहारी गेलेले हे तरुण-तरुणी आपला जीव धोक्यात घालत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका 16 वर्षाच्या तरुणीने आपल्यामागे धावती ट्रेन दाखवण्याच्या नादात जीव गमावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादमध्ये एका 16 वर्षीय तरुणाचा धावत्या ट्रेनसमोर व्हिडीओ काढण्याच्या नादात मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, आपला व्हिडीओ व्हायरल व्हावा अशी इच्छा असणाऱ्या या तरुणाचा शेवटच्या क्षणातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो रिल शूट करण्यासाठी ट्रॅकच्या अगदी जवळ उभा असल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर कुटुंबासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. 


मोहम्मद सरफराज असं या 16 वर्षीय तरुणाचं नाव असून तो नववीत शिकत होता. सनथ नगर येथे ही घटना घडली आहे. मोहम्मद आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम रिल शूट करण्यासाठी गेला होता. व्हिडीओत त्याच्या मागे एक ट्रेन येताना दिसत आहे. यावेळी मोहम्मद ट्रॅकच्या शेजारी उभा राहून ट्रेन आपल्या मागून जाण्याची वाट पाहताना पोझ देत उभा असल्याचं दिसत आहे. 


मात्र ही ट्रेन जवळ येताच मोहम्मदला धडक बसते आणि तो खाली कोसळतो. यानंतर त्याचे मित्र त्याच्याकडे धाव घेतात. पण या धडकेत मोहम्मदचा जागीच मृत्यू होतो.  हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 



मोहम्मदच्या वडिलांनी सांगितलं आहे की, शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी तो घराबाहेर पडला होता. पण काही तासांनी त्याचे वर्गमित्र मुझम्मिल आणि सोहेल घरी आले आणि मोहम्मद रेल्वे ट्रॅकवर बेशुद्ध पडला असल्याचं सांगितलं. जेव्हा मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तो मृतावस्थेत पडला होता. रेल्वे पोलिसांनी शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नेला आहे. 


दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन मोबाइल जप्त केला आहे. तसंच याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.