Viral Video: तरुणाई एकीकडे सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचं दिसत असताना, काहीजण मात्र याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करताना दिसत आहे. आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी किंवा जागरुक करण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी काहीजण सोशल मीडियाचा अत्यंत योग्यपणे वापर करत आहेत. यामुळे अनेक गोष्टी समोर येत असून त्यांच्यावर जाहीरपणे चर्चा केली जात आहे. तसंच अनेकांना न्यायही मिळत आहे. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या लखनऊनमध्ये घडला आहे. एका महिलेने एका पोलीस कर्मचाऱ्यालाच शाळकरी मुलीची छेड काढताना पकडलं असून, त्याला जाब विचारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशात ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तोच पोलीस कर्मचारी एका शाळकरी मुलीचा गाडीवरुन पाठलाग करत होता. मुलगी शाळा सुटल्यानंतर सायकलवरुन घरी जात असताना, पोलीस कर्मचारी दुचाकीवरुन तिच्या बाजूने चालला होता. यावेळी मागून गाडीवरुन प्रवास करणाऱ्या एका महिलेने कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. 


पोलीस कर्मचारी शाळकरी मुलीची छेड काढत असल्याचं पाहिल्यानंतर महिला त्याला रोखते. यावेळी महिला आणि आणखी एक व्यक्ती पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारतात. तू मुलीचा पाठलाग का करत आहेस? अशी विचारणा ते त्या पोलीस कर्मचाऱ्याला करतात. 


व्हिडीओ दिसत आहे त्यानुसार, दोघेही पोलीस कर्मचाऱ्याला स्कूटरला नंबर प्लेट का नाही आहे? अशी विचारणा करत असल्याचंही दिसत आहे. "तुम्ही कोण आहात? त्या मुलीला तुम्ही ओळखता का?," असं महिला पोलीस कर्मचाऱ्याला विचारते. यावर पोलीस कर्मचारी ही आपल्या मुलीची वर्गमैत्रीण असल्याचा दावा करतो. त्यावर महिला पोलीस कर्मचाऱ्याला त्याची स्कूटर रस्त्याच्या बाजूला पार्क करायला सांगते. 



जेव्हा महिला पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या मुलीचं नाव विचारतो, तेव्हा तो खोटं नाव सांगतो. महिलेने हा पोलीस कर्मचारी रोज मुलींची छेड काढत असल्याचा दावा केला आहे. 


दरम्यान, दोघेही पोलीस कर्मचाऱ्याला त्याचं हेल्मेट काढायला सांगतात. तसंच स्कूटरवर नंबर प्लेट का नाही आहे अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी उत्तर देतो की, इलेक्ट्रिक गाडी असल्याने तिच्यावर नंबर प्लेट नाही. 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत कारवाई केली आहे. 


लखनऊ पोलिसांनी याप्रकरणी निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, या घटनेची दखल आम्ही घेतली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसंच विभागीय कारवाईला सुरुवात करत आहोत.