सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. तुम्हालाही तुमचे मित्र, नातेवाईक यांच्याकडून कोणी ना कोणीतरी लग्नाचं आमंत्रण नक्की पाठवलं असेल. लग्नात जायचं म्हटलं तर अनेकजण उत्साही असतात. कपाटात धूळ खात पडलेले नवे कपडे यानिमित्ताने घालण्याची आणि मिरवण्याची संधी यानिमित्ताने मिळते. दुसरं म्हणजे लग्नातलं जेवण खायला मिळणार असल्याने तो आनंदही असतो. लग्न जर आलिशान असेल तर तिथे स्टाटरपासून ते वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू असतात. अशावेळी नेमकं काय खावं असा प्रश्न अनकेदा पाहुण्यांना पडतो. पण जर लग्नात मांसाहार आणि शाकाहार असे दोन्ही पर्याय असतील तर? तुम्ही कोणत्या टेबलवर जाणं पसंत कराल. अनेकजण मांसाहार असंच उत्तर देतील. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडीओत शाकाहारी आणि मांसाहारी यांच्यात जणू काही स्पर्धाच लागली आहे. पण एकहाती मांसाहाराने ही स्पर्धा जिंकली आहे. याचं कारण एकीकडे मांसाहारासाठी पाहुण्यांची हाणामारी सुरु असताना, शाकाहाराकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. 


इंस्टाग्रामला शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत, मांसाहाराच्या टेबलवर पाहुण्यांनी अक्षरश: गर्दी केली होती. यावेळी एकमेकांना धक्काबुक्की केली जात आहे. वेटरने सर्वात आधी आपल्याला सर्व्ह करावं यासाठी पाहुण्यांनी स्पर्धाच लावली होती. हातात प्लेट धरुन प्रत्येकजण आपला नंबर पहिला लागावा यासाठी प्रयत्न करत होतं. काही पाहुण्यांनी तर प्रकरण आपल्या हातात घेतलं होतं. प्लेटमधून खेचून घेत ते थेट आपल्या प्लेटमध्ये टाकत होते. ही स्थिती चेंगराचेंगरीपेक्षा कमी नव्हती. 



व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसा त्यात चिकन टिक्का, कबाब शिजवताना दिसत आहेत. यादरम्यान एक पाहुणा वेटरकडून सर्व कबाब हिसकावून घेत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. पण याउलट स्थिती शाकाहारी टेबलवर होती. तिथे वेटर एखादा पाहुणा कधी येणार याची वाट पाहत उभे होते. 


तव्यावर भाजी, आलू टिक्की दिसत असतानाही तिथे वेटरकडे माशा मारण्यापेक्षा दुसरं कोणतं काम नव्हतं. वेटरच्या चेहऱ्यावरुनच त्यांचा उत्साह किती कमी होता हे दिसत होते. म्हणजे थोडक्यात जेव्हा शाकाहारी आणि मांसाहारीचा पर्याय असतो तेव्हा शाकाहारी जेवण मागे पडतं. तुम्हाला जेव्हा हे दोन पर्याय मिळतात तेव्हा तुम्ही काय निवडता?