नवी दिल्ली : आम आदमी पक्षानं (आप) त्यांचे बंडखोर नेते कुमार विश्वास यांच्यावर पलटवार केला आहे. दिल्लीतल्या नगर पालिका निवडणुकांनंतर दिल्लीतील केजरीवाल सरकार पाडण्याचा प्रयत्न कुमार विश्वास यांनी केल्याचा आरोप आपनं केला आहे. राज्यसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे कुमार विश्वास यांनी केजरीवाल सरकारबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'विश्वास यांच्या घरी आमदारांच्या बैठका'


मागच्या वर्षी एप्रिलमध्ये एमसीडी निवडणुकीनंतर कुमार विश्वास यांच्या घरी बैठका झाल्या. या बैठकांना काही आमदारही उपस्थित होते. कपिल मिश्रा या बैठकीला गेले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं, असा दावा आप नेते गोपाल राय यांनी केला आहे.


आम आदमी पार्टीने (आप) अखेर राज्यसभेसाठी उमेदवार दिले आहेत. पक्षाचे नेते संजय सिंह, सुशील गुप्ता, एन. डी. गुप्ता या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाची बैठक झाली. यावेळी राज्यसभा उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. मात्र, कुमार विश्वास आणि आशुतोष यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले नव्हते.


संजय सिंह हे आपचे संयोजक आहेत. ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनासोबत पहिल्यापासूनच जोडलेले आहेत. तर नारायण दास गुप्ता 'आप'चे दोन वर्षांपासून चार्टर्ड अकाऊंट म्हणून काम पाहतात. तर तिसरे उमेदवार सुनील गुप्ता एक ट्रस्ट चालवतात.