वहिनीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या आरोपावरुन पंचायतीने सुनावली `अग्निपरीक्षे`ची शिक्षा; Video Viral
Walking On Burning Coal: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. व्हिडीओमध्ये गावकरीही आरडाओरड करताना दिसत आहेत.
Walking On Burning Coal: आजही देशातील ग्रामीण भागांमध्ये पंचायतींचे निकाल हे अंतिम समजले जातात. मात्र पंचायतींकडून देण्यात येणाऱ्या काही विचित्र निकालांमुळे त्या कायमच चर्चेत असतात. असेच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. एका पंचायतीने दिलेल्या या आदेशाअंतर्गत सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झालं असं की आपल्या वहिनीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला सुनावण्यात आली. पंचायतीने जारी केलेल्या आदेशानुसार आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी या व्यक्तीला धगधगत्या कोळश्यात हात घालण्याची शिक्षा सुनावण्यात आली. या धगधगत्या कोळश्यामधून लोखंडाची एक सळईही या तरुणाने काढून दाखवली.
कुठे घडला हा प्रकार?
ही संपूर्ण घटना तेलंगणमध्ये घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा सारा प्रकार मुलुग गावामध्ये घडला. येथील पंचायतीने दिलेल्या आदेशानुसार आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी या तरुणाने 'अग्निपरीक्षा' दिली. आपल्याच मोठ्या भावाच्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप या तरुणावर करण्यात आला होता. यानंतर संपूर्ण गावासमोर झालेल्या सुनावणीमध्ये या तरुणाला शिक्षा सुनावण्यात आली. निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी धगधगत्या कोळश्यात ठेवलेली लोखंडाची सळई बाहेर काढण्याचं आव्हान या तरुणाला देण्यात आलं होतं.
व्हिडीओत काय दिसतंय?
या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये हा तरुण कोळश्याच्या ढिगाऱ्याभोवती फेऱ्या मारताना दिसत आहे. आधी हा तरुण या कोळश्यांच्या आजूबाजूला फेऱ्या मारतो. त्यानंतर तो या कोळश्यांच्या ढिगाऱ्याच्या मध्यभागी ठेवलेली आणि तापून लाल झालेली लोखंडाची सळई हाताने उचलून बाहेर फेकतो.
तरुणाचं नाव काय?
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचं नावं गंगाधर असं आहे. आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याला हे करावं लागलं. व्हिडीओमध्ये या व्यक्तीने अंगावर केवळ पॅण्ट घातली असून तो अर्धनग्नावस्थेत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गावकऱ्यांचाही आवाज येत आहे. गावकरी या तरुणाला प्रोत्साहन देत असून कोळश्यातून तापलेली सळई बाहेर काढण्यास सांगत आहे.